पिंपरी: "आई... मी आता नदीत उडी मारतोय..." असे म्हणत व्हिडीओ कॉलवर नदीचे दृश्य दाखवणारा २० वर्षीय तरुण रावेत येथील लंडन ब्रिजच्या संरक्षक जाळीच्या आत कठड्यावर उभा होता. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली. प्रथम त्याची समजूत काढत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योग्य संधी साधून त्याला मागे ओढत मृत्यूच्या दारातून अक्षरशः खेचून आणले. रावेत पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे तरुणाचे प्राण वाचले.
संबंधित तरुण मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून सध्या तो हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात वास्तव्यास आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋषीकेश घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लंडन ब्रिज परिसरात रात्री गस्त घालत असताना पोलिस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर यांना पुलाच्या कठड्यावर एक तरुण संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी तो आत्महत्येच्या उद्देशाने नदीत उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, संबंधित तरुणाने आपल्या आईला व्हिडीओ कॉल करून नदीचे दृश्य दाखवत आपण नदीत उडी मारणार असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच त्याची आई रावेतच्या दिशेने निघाली. तोपर्यंत पोलिसांनी संयम राखत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संवाद सुरू असतानाच पोलिसांनी त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि योग्य क्षण साधून मोठ्या धाडसाने त्याला मागे ओढून सुरक्षित बाजूला आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक चौकशीत, मोबाईलवरील ऑनलाइन जुगारात सुमारे १५ हजार रुपये गमावल्याने संबंधित तरुण मानसिक तणावात आला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले. या घटनेमुळे युवकांमध्ये वाढत्या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक तसेच मानसिक संकटाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या आईने मुलाला सुखरूप पाहताच सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाचे समुपदेशन करून त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या धाडसी आणि प्रसंगावधान राखणाऱ्या कामगिरीमुळे एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.