पिंपरी: मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून, येत्या शनिवारी (दि. 21) रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. ईदच्या दिवशी खास असलेला ‘शिरखुर्मा’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुकामेवा तसेच विविध प्रकारच्या शेवया खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे.
रमजान पर्वात मुस्लिम बांधवांचे काही खास पदार्थ तयार होत असतात. ते पदार्थ फक्त रमजान पर्वातच उपलब्ध होतात. रमजान महिन्यात इफ्तारसाठी या पदार्थांची मेजवानी असते. त्यामुळे मिठाई, ड्रायफ्रुट तसेच खमंग पदार्थांची अनेक दुकाने शहरात थाटली असल्याचे दिसून आले आहेत.
मुस्लीम बांधवांकडून शिरखुर्मा, सुतरफेणी, मालपोवा, शाही तुकडा, तुर्री आणि कबाब या पदार्थांना रमजान महिन्यात जास्त मागणी आहे. जवळपास या सर्वच पदार्थांमध्ये शेवया वापरल्या जातात. शहरातील बाजारात सुकामेव्याची मोठी आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहरातील विविध भागात सुकामेव्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर मुस्लिम बाधंवाकडून सुकामेवा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. बाजारात रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर विविध प्रकारचे ड्रायफ्रुटस दाखल झाले आहेत.
बनारस, खिमामी फेणी
ईद सणात केला जाणारा सर्वात स्पशेल पदार्थ म्हणजे शिरखुर्मा. हे बनविण्यासाठी पांढऱ्या, पिवळ्या, केशरी आणि हिरव्या रंगातील बारीक शेवया घेण्यासाठी बाजारातील स्टॉलवर गर्दी होत आहे. फेणीमध्येही यंदा वेगळे प्रकार आले आहेत. यात बनारस अर्थात पातळ शेवई उपलब्ध आहे. तसेच भाजलेल्या तयार खिमामी फेणीला चांगली मागणी आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुटचे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवले आहे.