नवी सांगवी: रक्षक चौक परिसरात सध्या सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूककोंडी होत आहे. या कामामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला असून, सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीचा गैरफायदा घेत काही दुचाकीस्वार थेट पदपथावरून वाहने चालवत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विदेशी पर्यटकाने वाहतूक पोलिसांच्या हे लक्षात आणून देऊनही वाहतूक पोलिस सुस्त असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला पदपथ आधीच उड्डाण पुलाच्या कामासाठी काही अंशी तोडण्यात आला आहे. त्यामुळे चालण्यासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी झाली असून, त्यावरून दुचाकी चालवल्या जात असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींना या मार्गावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर अलीकडेच एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका परदेशी नागरिकाने पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना नियमांची आठवण करून देत त्यांना रस्त्यावरूनच वाहन चालविण्यास भाग पाडले असल्याचे दिसून येते. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, मआपल्या शहरात नियम पाळण्याची शिकवण परदेशी नागरिकांनी द्यावी लागते, ही शोकांतिका आहे,फ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहे.
नागरिकांच्या मते, या संपूर्ण प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने या चौकात विशेष वाहतूक नियोजन, योग्य मार्गदर्शन व पोलिस बंदोबस्त आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र वाहतूक शाखेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या दिसत नाहीत. परिणामी, नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांचे फावले असून, पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. उड्डाण पुलाचे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी त्याचा फटका सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला बसू नये, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी सांगवी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
रक्षक चौक परिसरात उड्डाण पुलाच्या कामाने रस्ता अरुंद झाला आहे. काम होईपर्यंत वाहनचालकांना काही काळ वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र, पदपथावरून दुचाकी चालवून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येईल.सुदामा पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक
पदपथ कोणासाठी?
सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कामावरून घरी परतताना पायी चालणाऱ्या नागरिकांकडून तीव नाराजी व्यक्त केली जात आहे. पदपथ आमच्यासाठी आहे, वाहनांसाठी नाही, अशी भावना व्यक्त करत संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, स्पष्ट सूचना फलक, तसेच कामाच्या कालावधीत पर्यायी मार्गांची योग्य आखणी करण्याची गरज नागरिकांनी अधोरेखित केली आहे.
सायंकाळी ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी तसेच शारीरिक व्यायाम करण्यासाठी सांगवी फाटा येथून रक्षक चौकाच्या दिशेने पायी चालत जाताना वाहतूक ठप्प झाल्यास बेशिस्त वाहनचालक मोठ्या संख्येने पदपथावरून वाहने दामटत असतात. या वेळी अपघात घडून एखाद्याचा जीव गेल्यावरच वाहतूक पोलिस प्रशासन याकडे लक्ष केंद्रित करणार का?सुरेश तावरे, ज्येष्ठ नागरिक, सांगवी