Raksha Bandhan Tragedy Pudhari
पिंपरी चिंचवड

Raksha Bandhan Tragedy: ...अन् मायेने उंचावलेला 'तो' हात ठरला अखेरचा; रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणीला कायमचा निरोप

गुरुवारी (दि. २७) पहाटे मात्र कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रक्षाबंधनाच्या तयारीने घरात आनंदाचे वातावरण होते. बहिणीने खरेदी पूर्ण केली होती, तर भावानेही तिच्यासाठी साडी आणि ओवाळणी तयार ठेवली होती. बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास शिल्पा सचिन गवारे नणंद यांच्या सोबत खरेदी करून आली.

त्यानंतर सासरी जाताना तिने भाऊ संतोष कलाटे यांच्याकडे पाहून मायेने हात केला. तो साधासा निरोप काही तासांतच अखेरचा ठरेल, याची कोणालाही कल्पना नव्हती.

गुरुवारी (दि. २७) पहाटे मात्र कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिल्पाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आली. दुसऱ्या दिवशी बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भावांसमोर आदल्या रात्रीचा तिचा निरोप देतानाचा हसरा चेहरा उभा राहिला.

'ती जाताना मला हात करून गेली...' एवढे सांगताना भाऊ संतोष कलाटे यांचा कंठ दाटून आला. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहिणीची आठवण निघताच त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

शिल्पाने रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच आवश्यक खरेदी करून ठेवली होती. संतोष यांनीही बहिणीसाठी साडी आणि ओवाळणीची तयारी केली होती. त्यामुळे काही तासांपूर्वीपर्यंत घरात सणाची लगबग होती.

शिल्पाच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून पुढे असा अनर्थ घडेल, अशी कोणतीही चाहूल कुटुंबीयांना लागली नव्हती.

गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास शिल्पाचा दीर संदीप याने तिचा भाऊ रणजित याला फोन करून शिल्पा आणि तिचा पती सचिन यांच्यात भांडण झाल्याचे तसेच तिला काळेवाडी फाटा येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तेथे डॉक्टरांनी शिल्पाला मृत घोषित केले होते.

शिल्पाने बेडरूममधील सीलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे पतीकडून सांगण्यात आले आहे. तिच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत माहेरच्यांनी संशय व्यक्त केला असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रक्षाबंधनासाठी बहिणीच्या स्वागताची तयारी करणारा भाऊ संतोष यांच्या वाट्याला यंदा मात्र तिचा अखेरचा निरोप आला. मनगटावर राखी बांधण्यासाठी बहिणीचा हात आता नसला, तरी आदल्या रात्री निरोपासाठी उंचावलेला तो हात भावाच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT