हजवडी : हिंजवडी परिसरात रविवारी पहाटेपासून वरुण राजाचे पुन्हा आगमन झाले आहे. जून महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात दुसर्या आठवड्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
रविवारी देखील दिवसभर पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत होते. तसेच डोंगर भाग आणि धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळत आहेत.
हिंजवडी आयटी परिसरात रविवार सकाळ पासून पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत होत्या. रविवारी बहुतांश आयटी कंपन्यांना सुट्टी असल्याने रस्त्यावर वाहने कमी होती; परंतु तरीही काही ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. हिंजवडी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. मारुंजी येथे देखील मुख्य रस्ता; तसेच एम.के.जीम आणि शिंदेवस्ती येथील रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते.
या पावसामुळे अनेक गावात भात लावणी सुरू झाली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कासारसाई येथील धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.