Raigad Rain | रायगडमध्ये ‘कोसळधार’ ; पनवेलमध्ये गाढी, रोह्यात कुंडलिकेला पूर

पनवेल, कळंबोली जलमय ; चोवीस तासात 1234 मिमी पावसाची नोंद
Raigad Rain
रायगड : शनिवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने पनवेल मधील गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली. यामुळे करंजाडे कोळीवाड्यातील अनेक घरांमध्ये नदीचे पाणी शिरले. (छाया ः राजेश डांगळे)

रायगड : रविवारी रायगड जिल्हयातील पनवेल, कर्जत आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसाने पनवेल तालुक्यातील तळोजा, कळंबोली जलमय झाले. पहिल्याच मोठ्या पावसाने येथील नालेसफाईचा फज्जा उडविला. तर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी शिरल्याने कारखान्यांतील कामे ठप्प झाली. गाढी नदीचे पाणीही धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. रोह्यात कुंडलिका नदी दुठडी भरून वाहू लागली असून भुवनेश्वर येथे कालव्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. कर्जतमध्येही जोरदार पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 1234 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस माथेरान आणि पनवेल तालुक्यात झाला असून हवामान विभागाने आगामी चार दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.

जुलै महिना सुरु झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला नव्हता. जुलै महिन्याचे पहिले सहा दिवस साधारण पावसाचे गेले. जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो मात्र या वर्षी पावसाची वाटचाल संथ गतीने सुरु आहे. मात्र रविवारी (7 जुलै) जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसून आला आहे. पनवेल, खालापूर, कर्जत आणि रोहा तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस आहे. कर्जतमध्ये शनिवार, रविवार जोरदार पाऊस झाला. याचा फटका महावितरण विभागाला बसला. विजेचे खांब पडले. परिणामी दहिवली परिसरातील काही भागात वीज प्रवाह खंडित झाला. तर कर्जत शहरातही विजेचा लपंडाव सुरु होता. वंजारवाडी येथील वीज प्रवाह हि खंडित झाल्याने त्याचा परिणाम कर्जत शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला. तर मुद्रे परिसरातील काही भागात नाले गटारे स्वच्छतेअभावी ते तुंबून पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला.

अद्याप नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही

जिल्हयातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. मात्र कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. शेतीची लागवडीची कामे आता हाती घेतली जाणार आहेत, त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. माणगाव तालुक्याला अक्षरशः झोडपले त्यामुळे माणगाव तालुक्यातील काळ नदी, गोदनदी व कुंडलिका नदीला पूर आला.

पनवेलमध्ये पाणीच पाणी

रविवारच्या पावसाने पनवेल तालुक्याला झोडपून काढले. रात्रभरच्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीकरांची तारांबळ उडाली. विविध भागात पाणीच पाणी झाले. पाण्याखाली गेलेल्या कळंबोलीमुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईचा पुरता फज्जा उडाल्याचे सांगितले जाते. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदारांना चांगलाच फटका बसला आहे. प्रचंड प्रमाणात साठलेले पाणी कारखान्यात घुसल्याने मशिनरी बंद पडली. कोणती अघटीत घटना घडू नये म्हणून एमआयडीसीकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने करोडो रुपयाचे नुकसानीचा फटका कारखानदारांना बसला आहे.

तळोजा एमआयडीसीत अनेक कारखान्यांत पाणी

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाळ्यापूर्व करावयाची नालेसफाई व अन्य साफसफाई एमआयडीसी प्रशासनाने न केल्यामुळे त्याचा फटका रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कारखानदारांना बसला आहे. प्रचंड प्रमाणात पाणी साठल्याने साठलेले पाणी कारखान्यात घुसले. कारखान्यातील मशिनरी ही बंद पडली. कोणती अघटीत घटना घडू नये म्हणून एमआयडीसीकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अचानक झालेल्या वीजपुरवठा खंडित केला गेला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news