Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा कंदील; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

माण ते बालेवाडी टप्प्याला सीएमआरएसची मंजुरी; ताशी ८० किमी वेगाने धावणार मेट्रो, उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या बहुचर्चित 'पुणे मेट्रो मार्गिका-३'च्या (हिंजवडी-शिवाजीनगर) प्रत्यक्ष प्रवासी सेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पातील 'माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)' या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता असून, उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याच्या हालचाली पीएमआरडीए आणि राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत असलेल्या 'सीएमआरएस'ने २३ जुलै रोजी या १३ किलो मीटर लांबीच्या आणि १२ स्थानके असलेल्या टप्प्यासाठी 'तात्पुरते प्राधिकरण' प्रदान केले. सर्व वैधानिक तपासण्या, चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे.

'सीएमआरएस'ने ५ ते ८ जुलैदरम्यान 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मार्गाची सखोल तपासणी केली होती. या तपासणीत उपस्थित केलेल्या तांत्रिक आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर कंपनीने पूर्तता अहवाल सादर केला. या मार्गावर मेट्रोची अंतिम चाचणीही यशस्वी झाली. त्यानंतर अग्निशमन दल, दूरसंचार विभाग, शासनाचे मुख्य विद्युत निरीक्षक आणि इतर सर्व आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे तपासूनच ही अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

मेट्रोला वैधानिक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने आता प्रत्यक्ष उद्घाटनाचे वेध लागले आहेत. पीएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताशी ८० किमी वेगाने धावणार मेट्रो

सुरक्षा आयुक्तांच्या या मंजुरीमुळे सीबीटीसी (CBTC) सिग्नलिंग प्रणाली अंतर्गत 'एटीपी' मोडवर मेट्रो ताशी कमाल ८० किलो मीटर वेगाने धावू शकणार आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग ७५० व्होल्ट डीसी 'थर्ड रेल ट्रॅक्शन' प्रणालीवर कार्यरत राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT