Pune Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Line 3: हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो सेवेला हिरवा कंदील; मार्गिका-३ला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी

माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियमदरम्यान १२ स्थानकांवरून धावणार मेट्रो; ताशी ८० किमी वेगाने प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी २३ जुलै रोजी तात्पुरते प्राधिकरण (Provisional Authorization) प्रदान केले आहे.

या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत 'एटीपी' मोडवर मेट्रो ताशी ८० किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकणार आहे. सर्व वैधानिक तपासण्या, चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीवर कार्यरत राहणार आहे.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ५ ते ८ जुलै या कालावधीत 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' (PITCMRL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मार्गाची सखोल पाहणी केली होती. प्राथमिक तपासणी आणि त्यानंतरच्या आढाव्यादरम्यान सुरक्षा आयुक्तांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवरील पूर्तता अहवाल कंपनीने सादर केला. प्रत्यक्ष मंजुरी देण्यापूर्वी या मार्गावर मेट्रोची निश्चिती चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. तसेच, सुरक्षा आयुक्तांनी सर्व प्रमुख मेट्रो प्रणालींशी संबंधित तांत्रिक मंजुरी, आयएसए प्रमाणपत्र, शासनाच्या मुख्य विद्युत निरीक्षकांचे (CEIG) ना-हरकत प्रमाणपत्र, दूरसंचार विभागाचा (DoT) परवाना, सर्व १२ स्थानकांसाठी अग्निशमन विभागाची ना-हरकत प्रमाणपत्रे, तसेच स्थापत्य, ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉक प्रणालींसंदर्भातील सर्व प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी केली.

या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले की, पुणे मेट्रो मार्गिका-३ ला मिळालेली ही वैधानिक सुरक्षा मंजुरी प्रकल्पाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा आहे. सुरक्षितता, उच्च गुणवत्ता आणि उत्कृष्ट अभियांत्रिकीप्रती असलेली आमची बांधिलकी यातून अधोरेखित होते. तसेच पुणेकरांच्या सेवेत आधुनिक मेट्रो दाखल करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आम्ही आणखी एक निर्णायक पाऊल पुढे टाकले आहे. सुरक्षा आयुक्तांची ही मंजुरी हिंजवडीच्या आयटी हबला पुणे शहराशी जोडणाऱ्या आधुनिक, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या 'पुणे मेट्रो मार्गिका-३' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेली सुरक्षा आयुक्तांची मंजुरी ही पुणेकरांसाठी आणि पीएमआरडीएसाठी समाधानकारक बाब आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाने निर्णायक टप्पा गाठला असून, उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ही प्रवासी सेवा लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यास पीएमआरडीए प्रशासन कटिबद्ध आहे.
डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT