पिंपरी: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आयटीनगरी हिंजवडीला जोडणारी बहुचर्चित पुणे मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाचे काम दिरंगाईबाबत पीएमआरडीए आयुक्तांनी मेट्रोची स्वतंत्र बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची डेडलाईन पाळा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशारा दिल्याने मेट्रोचा अभियांत्रिकी विभाग झपाटून कामाला लागला आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे आयुक्तांनी मार्च महिन्याच्या अखेरीस सलग दोन बैठका घेतल्या. प्रत्यक्षात मार्च 2026 मध्ये हे काम पूर्ण होऊन मेट्रो धावणे आवश्यक होते; परंतु विविध कारणे आणि कंत्राटदार कंपनीच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे हा प्रकल्प लांबला. दरम्यान, या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कंत्राटदार कंपनीला सुनावले. तसेच, खरमरीत पत्र पाठवून काम लवकर पूर्ण करा, असे स्पष्ट इशारा दिला आहे. मे 2026 पर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याची डेडलाईन पाळा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लि. (पीआयटीसीएमआरएल) द्वारे राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी डॉ. चौधरी यांनी औंध येथील कार्यालयात बैठक घेतली होती. त्यानंतर पुन्हा बुधवारी अभियांत्रिकी विभागाची बैठक घेतली. अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, पीएमआरडीएच्या मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कामाचा आढावा घेण्यासाठी बुधवार (दि. 1) पुन्हा आढावा घेतल्याने अभियांत्रिकी विभाग खडबडून जागा झाला आहे.
पहिला टप्पा सुरू करा
मेट्रो मार्गावरील तांत्रिक आणि स्थापत्य (सिव्हिल) कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेत पहिला टप्पा सुरू करा, असे सुचवले आहे. मेट्रोसाठी लागणारे मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि प्रलंबित असलेली स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिला टप्पा मे 2026 अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 12 स्थानकांचा समावेश असणार आहे.
कामास उशीर; कंत्राटदाराला नोटीस
मेट्रोचे कराराप्रमाणे वाढीव मुदत ही मार्च 2026 पर्यंत होती. मात्र, हा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. अद्याप मेट्रोची स्थानकांचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, करारानुसार मेट्रो कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. या पूर्वी मेट्रोला उशिरा कामाबाबत नोटीसदेखील देण्यात आली होती. तर, त्यानंतर पत्राद्वारे काम लवकरच करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
प्रकल्पाचा वेळोवेळी आढावा घेत आहे. हा प्रकल्प लवकर सुरू करण्याचा मानस आहे. पहिल्या टप्प्यासाठी मे 2026 ची डेडलाईन पाळण्यासाठी तांत्रिक व इतर कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए