

राहुल हातोले
पिंपरी: पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून त्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) करण्यात आले; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या निर्णयाचा अपेक्षित फायदा नागरिकांना अद्याप मिळत नाही. नागरिकांना विविध कामांसाठी दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे दर्जा वाढवला, मात्र कामाचे काय, असा प्रश्न येथे कामानिमित्त येणारे नागरिक उपस्थित करत आहेत.
शासनाने जुलै 2023 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक दर्जा देण्यात आला. या निर्णयामुळे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ झाली. जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि पिंपरी-चिंचवड या विस्तृत भागाचा समावेश या कार्यालयाच्या अखत्यारित करण्यात आला. दर्जा वाढल्यानंतर कार्यालयासाठी एकूण 118 पदांना मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ 95 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सुमारे 23 पदे अद्याप रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांना होतोय त्रास
आरटीओ कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक विविध कामांसाठी येत असतात. यामध्ये वाहन परवाना काढणे, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकी हस्तांतरण, वाहन कर भरणा, वाहन फिटनेस प्रमाणपत्र, दंड (चालान) भरणा अशी विविध कामे असतात; मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याने या कामांसाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
वाहन तपासणी आणि कारवाईवर परिणाम
पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-बंगळूर द्रुतगती मार्ग - जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहन तपासणी, कारवाई आणि दंड वसुली यासाठी मोटार वाहन निरीक्षकांची आवश्यकता असते. मात्र निरीक्षकांची संख्या कमी असल्यामुळे तपासणी मोहीम राबविण्यास अडचणी निर्माण होतात.
अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे काम संथगती
पिंपरी-चिंचवड आरटीओचा दर्जा वाढवणे हा निश्चितच सकारात्मक निर्णय आहे. मात्र, त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. वाढत्या कामाच्या ओझ्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरटीओचे कामकाज संथ गतीने सुरू आहे.
सर्वाधिक रिक्त पदे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची:
सर्वात जास्त रिक्त पदे ही मोटार वाहन निरीक्षकांची आहेत. ही पदे प्रत्यक्ष कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असतात.
मंजूर पदे : 40 भरलेली पदे : 24 रिक्त पदे : 16
पूर्ण भरलेली पदे मर्यादित:
कार्यालयात काही पदे पूर्णपणे भरलेली आहेत. त्यामध्ये लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, कामगार मात्र ही पदे सहाय्यक स्वरूपाची असल्याने मुख्य कामकाजावर त्यांचा मर्यादित प्रभाव असतो.