Ring Road Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Inner Ring Road Land Acquisition: पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग; मुळशी, हवेलीत जमीन मोजणीच्या तारखा निश्चित

हिंजवडी, जांबे, मारुंजी, नांदे आणि कोलवडीतील शेतकऱ्यांची मोजणीस सहमती; बाजारभावानुसार मोबदल्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या प्रस्तावित ‘इनर रिंग रोड’च्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील विविध गावांमध्ये आयोजित मोजणीपूर्व ग्रामबैठकांना ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मुळशीतील चार गावांमध्ये प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे दि. १३, तर कोलवडी येथे १५ ऑक्टोबरपासून मोजणी सुरू होणार आहे.

प्रस्तावित इनर रिंग रोडची रुंदी ६५ मीटर असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी नऊ मीटर रुंदीचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रशासनाकडून मोजणीपूर्व ग्रामबैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून भूसंपादनाची प्रक्रिया, मोबदल्याचे मूल्यांकन आणि त्यासंदर्भातील कार्यपद्धती यांची माहिती दिली जात आहे. संवादातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

मुळशी तालुक्यातील हिंजवडी, जांबे, मारुंजी आणि नांदे या चार गावांतील ग्रामस्थांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली आहे. त्यानुसार हिंजवडी येथे १२ ऑक्टोबर, जांबे येथे १३ ऑक्टोबर, मारुंजी येथे १५ ऑक्टोबर, तर नांदे येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष जमीन मोजणी करण्यात येणार आहे. नेरे आणि माण या गावांतील ग्रामस्थांशीही प्रशासनाचा संवाद सुरू असून, त्यांच्या स्थानिक मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे १३ ऑक्टोबरपासून जमिनींची संयुक्त मोजणी सुरू होणार आहे.

हवेली तालुक्यातील कोलवडी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली. या बैठकीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष जमीन मोजणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोजणीद्वारे बाधित क्षेत्र निश्चित केल्यानंतर संबंधित विभागांमार्फत बाधित क्षेत्रातील घरे, झाडे, विहिरी, कूपनलिका आणि पाइपलाइन यांचे पंचनामे करण्यात येतील. भूसंपादनाच्या अधिसूचनेनंतर मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती मागवून जमिनींचे मूल्यांकन केले जाईल. या प्रक्रियेत संबंधित व्यवहार आणि बाजारभाव विचारात घेऊन मोबदला निश्चित केला जाईल.

कोलवडीतील बैठकीत शेतकऱ्यांनी मांजरी खुर्दप्रमाणे बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली. प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करून, मोबदला निश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी शेतकरी अशोक आहाळे यांनी केली.

या बैठकीस यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, नितेश झुले, संतोष गायकवाड यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. पीएमआरडीएचे शाखा अभियंता कार्तिक पाटील, कनिष्ठ लिपिक रोहित चोपडे, मोजणी कर्मचारी मदन बारबरे आणि गावकामगार तलाठी अर्जुन साळी यांनीही बैठकीत सहभाग घेतला. दुसरीकडे, मावळ तालुक्यातील धामणे येथे पद्मावती देवी मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी विकासाच्या दृष्टीने विविध पर्याय आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. जमीन मोजणीनंतर बाजारभाव आणि संबंधित खरेदी-विक्री व्यवहारांचा विचार करून मोबदल्याचे मूल्यांकन केले जाईल. कोणत्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.
विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २२)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT