Pune Grand Tour 2026 Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Grand Tour 2026: पुणे ग्राँड टूर २०२६चा अंतिम टप्पा पिंपरी-चिंचवडमधून; शहर सज्ज

९९ किमी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीसाठी रस्ते सुशोभिकरण, वाहतूक व सुरक्षेची व्यापक तयारी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे ग््राँड टूर - 2026 या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा शुक्रवारी (दि. 23) पिंपरी-चिंचवड शहरातून पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या निकषांनुसार व्यापक व काटेकोर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शर्यत मार्गाचे आकर्षक सुशोभिकरण करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रमुख टप्पा म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून दुपारी 1.30 ला सुरू होणार आहे. पुणे शहरातील विविध मार्गांवरून जात हा टप्पा जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चारला होणार आहे. अंतिम टप्प्याचे एकूण अंतर 99.15 किलोमीटर आहे.

ही स्पर्धा औंध येथील राजीव गांधी पूल, काळेवाडी फाटा, रावेतमधील बास्केट बिज, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, स्पाईन रोड, जुना आरटीओ रस्ता, आयुक्त बंगला, एम्पायर इस्टेट उड्डाण पुल अशा महत्त्वाच्या मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध भाग एकाच आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहराची तयारी

स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती, गतिरोधक हटविणे, चेंबर्स समपातळीवर आणणे, बीआरटी रेलिंगची दुरुस्ती व रंगरंगोटी, पुलांचे सुशोभीकरण, थर्मोप्लास्टिक पेंटिंग, चौकांचे सौंदर्यीकरण, विद्युत व्यवस्था सुधारणा तसेच, संपूर्ण मार्गाची विशेष साफसफाई करण्यात आली आहे. पदपथ, कठडे धुवून घेण्यात आले आहेत. मार्गावरील बेवारस वाहने हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय व आपत्कालीन सेवा यांचेही सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राडारोडा व माती असलेल्या ठिकाणे पदडा लावून झाकण्यात आली आहेत. काही कालावधीसाठी आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

भित्तिचित्रांतून क्रीडा आणि संस्कृतीचा संगम

या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी क्रीडा, सायकलिंग, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा व विविध खेळांतील दिग्गजांचे दर्शन घडवणारी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सौंदर्यीकरण उपक्रमामुळे शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. अंतिम टप्प्यात देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT