पिंपरी : पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर-आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवार (दि. 23) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
टप्पा क्रमांक चार शर्यतीस म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथून सुरुवात होणार आहे. ती पुणे शहर हद्दीत जावून परत औंध येथील राजीव गांधी पुलमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणार आहे. सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी, काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी पुलमार्गे पुणे शहरात प्रवेश करणार आहे. स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी तसेच, नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड-एमआयडीसी, चिखली, काळेवाडी, भोसरी-एमआयडीसी, यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व सरकारी व खासगी शाळा दुपारी 12 नंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.