हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील अंतर मेट्रोसेवेमुळे आणखी कमी झाले आहे. पिंपरीहून सुमारे वीस मिनिटांत सुलभ आणि जलद प्रवास करत पुणे गाठता येते. दिवसेंदिवस मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत असून, सन 2025 या वर्षभरात 6 कोटी 71 लाख 40 हजार 907 प्रवाशांनी प्रवास केला. यात पीसीएमसी (पर्पल लाईन ) ते स्वारगेट मार्गावर 3 कोटी 1 लाख 39 हजार 53 प्रवाशांनी, तर वनाज ते रामवाडी 3 कोटी 70 लाख 1 हजार 854 प्रवाशांनी प्रवास केला आहे. गत वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोरेशनच्या तिजोरीत 105 कोटी 42 लाख 7 हजार 554 एवढा महसूल जमा झाला आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या 12.2 किलोमीटर दरम्यान 6 मार्च 2022 रोजी मेट्रोसेवा सुरू झाली; परंतु या दोन्ही मार्गावरील अंतर कमी असल्यामुळे, मेट्रोसेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. दुसऱ्या टप्प्यात 1 ऑगस्ट 2023 रोजी फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट 6.99 किलोमीटर, गरवारे कॉलेज ते रुबी हॉलपर्यंत 4.75 किलोमीटर मेट्रोसेवा सुरू झाली. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 6 मार्च 2024 रोजी रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत 5.5 किलोमीटर मेट्रोसेवा सुरू झाली. तसेच वनाज ते रामवाडीपर्यंत 16.5 पाच किमीचा पहिला मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आणि जलद प्रवास होण्यासाठी केंद्र, राज्य व महापालिकेच्या निधीतून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. नियोजनशून्य रस्ते विकास, अपूर्ण कामे आणि बेजबाबदार प्रशासन यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते; मात्र मेट्रोसेवा सुरू झाल्यापासून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका झाली असून दिवसेंदिवस मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सन 2025 वर्षभरात 6 कोटी 71 लाख 40 हजार 907 प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून 105 कोटी 42 लाख 7 हजार 554 एवढे उत्पन्न मिळाले आहे. यात लाइन-वन म्हणजेच पीसीएमसी (पर्पल लाईन) ते स्वारगेट मार्गावर 3 कोटी 1 लाख 39 हजार 53 प्रवाशांनी प्रवास केला. याच कालावधीत 49 कोटी 39 लाख 73 हजार 392 येवढे उत्पन्न मिळाले, तर वनाज ते रामवाडी लाइन-टू 3 कोटी 70 लाख 1 हजार 854 प्रवाशांनी प्रवास करून यातून 56 कोटी 2 लाख 34 हजार 162 येवढे उत्पन्न मिळाले आहे.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मेट्रोला गर्दी ः सरत्या वर्षाच्या 2025 च्या रात्री पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरात गेले होते. प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्रभर मेट्रोसेवा सुरू ठेवण्यात आली होती. मेट्रो प्रवाशांची ऑनलाईन सेवेला पसंती ः मेट्रो प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता यावे, यासाठी मेट्रो प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्यात आलेले आहे. तसेच शालेय विद्यार्थी तरुण-तरुणी रोज ये-जा करण्यासाठी स्मार्ट कार्डला पसंती दिली जात आहे. तसेच प्रवाशांची गैरसुविधा होऊ नये, म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
मेट्रोसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे. वयोमानानुसार शरीराला विविध त्रास होतात. पूर्वी पीएमपीने जायचे म्हटली की, तास, दोन तास लागायचे. ज्येष्ठांना वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असे. मेट्रोसेवेमुळे ज्येष्ठांचा प्रवास सुलभ आणि वेगवान झाला आहे.बजरंग माने मेट्रो प्रवासी
मेट्रो प्रवाशांची गैरसुविधा होऊ नये, म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच उत्तम प्रकारे सुविधा मिळत असल्याने मेट्रोसेवेला सरत्या वर्षीच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.चंद्रशेखर तामवेकर, जनसंपर्क अधिकारी मेट्रो.