

पिंपरी: श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची नागरिकांसह महापालिका आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर या प्रतिष्ठेच्या पदासाठी अनेकांनी राज्यसह केंद्रीय नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. त्या दृष्टीने पडद्यामागे वेगवान हालचालींना वेग आला आहे. अखेर, पक्षश्रेष्ठींकडून कोणाच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या आरक्षणाने अनेक दिग्गजांसाठी सत्तेचे दरवाजे उघडले आहेत. एकूण 128 पैकी 84 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर या मानाच्या खुर्चीवर भाजपाकडून कोणाला संधी मिळणार, यावरून लक्ष लागले आहे. खुल्या गटातील विजयी झालेले नगरसेवक तसेच, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापौर पदावर दावा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह राज्य तसेच, थेट केंद्रांच्या पदाधिकारी व नेत्यांकडे त्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. नेत्यांच्या जवळच्या व्यक्तीमार्फत नाव निश्चित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. आपल्या नावाची शिफारस विविध माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहचली जात आहे. त्यासाठी योग्य व्यक्तींमार्फत संदेश पोहचवले जात आहेत.
महापौरपद न दिल्याने स्थायी समितीचे अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे. तसेच, उपमहापौर व विविध विषय समितीचे सभापतीपद देण्याचे आश्वासन पक्षाकडून दिले जात आहे. पदासाठी इच्छुकांना आवर घालण्यासाठी पक्षाकडून विविध फंडे वापरले जाऊ शकतात. अखेर, पक्षश्रेष्ठींकडून महापौरपदी कोणाला संधी दिली जाते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसांपर्यंत त्या नावाबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम राहण्याची शक्यता आहे.
महापौरपदासाठी हे आहेत इच्छुक
महापौर पदाच्या शर्यतीत प्रामुख्याने भाजपाचे शहराध्यक्ष तथा तिसरे नगरसेवक झालेले शत्रुघ्न काटे, पक्षात प्रवेश घेऊन भाजपाची ताकद वाढविणारे माजी गटनेते राहुल कलाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, सलग तीन वेळा नगरसेवक असलेले शीतल शिंदे, सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे तसेच, माजी उपमहापौर तुषार हिंगे, दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले संदीप कस्पटे हे प्रमुख दावेदार आहेत. यांच्यासह अनेक नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने अनेकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी चुरस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या स्थायी समिती अध्यक्षाच्या हातात असतात. स्थायी समितीने मान्यता दिल्याशिवाय विकासकामांना चालना मिळत नाही. त्यामुळे या पदासाठी भाजपामध्ये मोठी रस्सीखेच आहे. महापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांपेक्षा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अनेकांना आग्रह धरला आहे. अनेक वर्षे पक्षाचा नगरसेवक असून, पूर्वी पक्षाने कोणतेही मोठे पद दिले नाही. पक्षासाठी पद सोडले, असे सांगत अनेक नगरसेवक त्या पदासाठी दावे करत आहेत. त्यादृष्टीने पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या वर्षी अध्यक्षपद आपल्यालाच मिळावे, यासाठी अनेकांनी हर तऱ्हेची तयारी करून ठेवली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तसेच, सर्व नगरसेवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, पक्षांच्या ध्येयधोरणानुसार कामकाज करण्यासाठी सत्तारूढ पक्षनेता हा महत्त्वाचा दुवा ठरतो. त्यासाठी अनुभवी व संघटन कौशल्य असलेला, संवादावर मजबूत पकड असलेल्या नगरसेवकांची त्या पदासाठी वर्णी लागू शकते.
भाजपाचे सात, राष्ट्रवादीचे तीन स्वीकृत नगरसेवक कोण ?
सन 2023 च्या नव्या नियमानुसार महापालिकेत एकूण 10 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. भाजपाला सर्वांधिक 7 तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. भाजपाकडून माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी महापौर उषा ढोरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, विलास मडिगेरी, सिद्धेश्वर बारणे, सचिन साठे, राज तापकीर, दीपक भोंडवे, माजी महापौर संजोग वाघेरे यांचा मुलगा ऋषिकेश वाघेरे-पाटील, सचिन काळभोर, संदीप काटे, अमोल थोरात, राजेश पिल्ले, संतोष बारणे, इतर पदाधिकारी व माजी नगरसेवक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक विनायक रणसुभे, मोरेश्वर भोंडवे, वसंत बोराटे, मयूर कलाटे, माजी नगरसेविका सीमा सावळे, पक्षाचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख व इतर पदाधिकारी इच्छुक आहेत.
बॉर्गेनिंग पॉवरवरून ठरणार कोणत्या गटाला कोणते पद
महापालिकेतील फेबु्रवारी 2017 च्या सत्ताकाळापासून भाजपात महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच, विविध विषय समितीचे सभापतीपदासाठी वेगवेगळ्या गटांना विभागणी करण्याची पथा सुरू झाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, सध्याचे आमदार शंकर जगताप, आ. महेश लांडगे तसेच, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे तसेच, जुन्या आणि निष्ठावंत असे वेगवेगळे गट आहेत. पक्षाकडून त्या गटांना वरील पदे वाटून देण्यात आली होती. महत्त्वाचे पद मिळावे म्हणून त्या गटांत प्रचंड वर्चस्व तसेच, रस्सीखेच दिसून आली आहे. त्याप्रमाणेच यंदाही अशी रस्सीखेच या वेगवेगळ्या गटांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या बॉर्गेनिंग पॉवरवरून चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना महत्त्वाचे पद मिळू शकेल. त्याकरिता प्रदेश पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठींकडे वेगवेगळ्या प्रकारे मोर्चेबांधणी केली जात असून, दबावतंत्राचा वापर केला जात आहे.
निवडीवरुन अंतर्गत संघर्षाची शक्यता
महापौरपदासाठी भाजपात अनेक जण इच्छुक आहेत. महापौरपदासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नगरसेवक तसेच, महापालिका कामकाजाचा अनुभव असलेले नगरसेवक दावा करीत आहेत. एकाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर आरक्षण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत सोमवार (दि. 22) काढण्यात आली. महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे (सन 2026 ते 2028) आरक्षण पडले आहे. ते आरक्षण पुढील अडीच वर्षांच्या काळासाठी लागू असेल. महापालिका निवडणुकीत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाला असल्याने आता भाजपामधील कोणत्या नगरसेवक महापौर होणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. त्या पदावर सत्ताधारी भाजपामध्ये अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
तीन पक्षांच्या नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्तांना सादर
महापालिकेत आता भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे तीनच प्रमुख पक्ष ठरले आहेत. अपक्ष पुरस्कृत एक नगरसेवक आहे. या तीनही पक्षांनी आपल्या नगरसेवकांची यादी व आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडे सादर केली आहे. ती यादी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे. त्यानुसार लवकरच भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीन पक्षांच्या गटांना अधिकृत मान्यता मिळेल. महापौर निवडीनंतर सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता व गटनेता यांची निवड होईल.
सहा फेब्रुवारीला ठरणार महापालिकेचा नवा महापौर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर सचिव विभागाने पुणे विभागीय आयुक्तालयांकडून महापौरपदाच्या निवडीची वेळ शुक्रवारी घेतली आहे. त्यांना 6 फेबु्रवारीची वेळ मिळाली आहे. त्या दिवशी महापौर निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. त्यात महापालिकेच्या नव्या महापौराची निवड केली जाईल, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले. त्या दिवसापासून महापालिकेत खऱ्या अर्थाने महापौर तसेच, नगरसेवकांमार्फत कारभार सुरू होईल आणि प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल.
एका वर्षासाठी पद दिल्यास मिळणार पाच जणांना संधी
महापौरपद हे एका वर्ष कालावधीसाठी दिले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 2026-2031 या पंचवार्षिकेत एकूण 5 नगरसेवकांना महापौरपद भूषविण्याची संधी मिळणार आहे. त्याप्रमाणे उपमहापौरपदही याच प्रकारे 5 नगरसेवकांना दिले जाऊ शकते. त्यामुळे तब्बल 10 नगरसेवकांना त्या दोन पदांचा मान मिळणार आहे.
विरोधी पक्षनेता कोण ?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता हा विरोधी पक्षनेता होणार आहे. त्या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पक्षात नव्याने आलेले आक्रमक चेहरा असलेले नगरसेवक संदीप वाघेरे हे प्रबळ दावेदार आहेत. तसेच, ताथवडे प्रभागात दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले पंकज भालेकर, चिखलीचे नगरसेवक विकास साने हेदेखील इच्छुक आहेत. निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपार थेट हल्लाबोल करीत रान पेटवले होते. त्याप्रमाणे चुकीच्या कामांविरोधा आवाज उठवणाऱ्या नगरसेवकाची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पंचवार्षिकेत पहिल्यांदा कोण विरोधी पक्षनेता होतो, याकडे लक्ष लागले आहेत.