Gril Elderly woman killed in Alandi  Pudhari
पिंपरी चिंचवड

Alandi Crime | आळंदी देवभूमी दुहेरी हत्याकांडाने हादरली: ६ वर्षीय चिमुरडीसह वृद्धेची निर्घृण हत्या

केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे मध्यरात्री घरात शिरून अज्ञाताचे कृत्य

पुढारी वृत्तसेवा

Gril Elderly woman killed in Alandi

आळंदी : वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊस किपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६ वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञाताने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला. तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली.

गुरुवारी (दि.२) सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय ? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT