वडगाव मावळ: मान्यवरांची उपस्थिती.. कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या टाळ्यांचा कडकडाट.. वैशाली बँक्वेटमधील लखलखाट.. अशा उत्साही वातावरणात मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या मान्यवरांचा 'पुढारी मावळ गौरव सन्मान' सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते; तसेच इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, ‘पुढारी’चे पिंपरी-चिंचवड आवृत्तीप्रमुख किरण जोशी, वितरण विभाग प्रमुख विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढारी मावळ गौरव सन्मान सोहळा तळेगाव दाभाडे येथे बुधवार (दि. ३०) संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शिक्षण, उद्योग व्यवसाय, सहकार, वैद्यकीय तसेच क्रीडा आणि शासकीय सेवा आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या मावळातील कर्तृत्ववान व्यक्तींना या वेळी 'पुढारी मावळ गौरव' सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ, असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पुरस्कारार्थींना उत्स्फूर्त दाद दिली.
‘पुरस्कारार्थींचे कर्तृत्व समाजासाठी आदर्शवत’
पुढारी मावळ गौरव सन्मान सोहळ्यासाठी पात्र ठरलेल्या पुरस्कारार्थींनी मावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय सहकार उद्योग शिक्षण अशा विविध क्षेत्रात वर्षानुवर्ष उल्लेखनीय कार्य करत आपले कर्तृत्व सिद्ध केले त्यामुळेच ते आज या सन्मान सोहळ्यातील पुरस्कारार्थी आहेत, अशा पुरस्कारार्थींचे कर्तृत्व समाजासाठी आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार आमदार सुनील शेळके यांनी या पुरस्कार सोहळाप्रसंगी काढले. तसेच गेली पाच वर्षांपासून पुढारी परिवार मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून त्यांना आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात त्याबद्दल ‘पुढारी’चे विशेष आभार मानले.
प्रसिद्ध इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे अनेक दाखले देत मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला उजाळा दिला. शिवकालीन काळापासून मावळच्या भूमीचे आणि मावळातील मावळ्यांचे असलेल्या योगदानाबद्दल त्यांनी विशेष माहिती या वेळी दिली. स्वागत व प्रास्ताविक किरण जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार यांनी केले.
पुढारी मावळ गौरव पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, संगीता सतीश खळदे, सागर निर्गुण बोडके, सिद्धार्थ गोरख दाभाडे, शिवाजी पवार, ॲड.नंदकुमार ज्ञानोबा काळोखे, दशरथ (नाना) अर्जूनराव ढोरे, अनिरुद्ध काळोखे, अशोक कुटे, भिकाजी भागवत, ॲड. दीपक वसंत चव्हाण, दीपक सोनवणे, ॲड. देविदास मराठे, किरण हुलावळे, डॉ. महेंद्र चव्हाण, पांडुरंग दत्तात्रय बांदल, सागर अशोक शहा, डॉ. सौरभ सतीश मेहता, शंकरगौडा हादीमनी, सुभाष धामणकर, सुभाष सूर्यवंशी, सुभाष डेनकर, सुनील दशरथ भोंगाडे, विलास बबनराव काळोखे, विनायक गंगाराम भेगडे, डॉ. यशवंत वाघमारे.