देहूगाव: देहूरोड शहर कॅन्टोन्मेंट कृती समितीच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर विविध स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रविवारी (दि. 10) सकाळी देहूरोड बाजार पेठेतून मोर्चा काढण्यात आला.
या वेळी ‘कॅन्टोन्मेंट हटाव, देहूरोड बचाव’ अशा घोषणा देत मोर्चा देहूरोड येथील शंकर मंदिरापासून सवाना चौक, वृंदावन चौक, भाजी मंडई, सुभाष चौक मार्गे उड्डाण पुलाखालील स्वामी विवेकानंद चौकात आला. (Latest Ahilyanagar News)
या वेळी देहूरोड बाजार पेठेतील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी, स्थानिक नेते, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. स्वतःचे शहर, स्वतःचा हक्क, कॅन्टोन्मेंट हटवा, नगर परिषद द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. दीपक चौगुले, रमेश जाधव, कैलास गोरवे, अरविंद गायकवाड, शनराज शिंदे, शीतल हगवणे, गोपाळ तंतरपाळे, कृष्णा दाभोळे, रघुवीर शेलार, बाबा हाजीमलंग आदींनी आपला रोष व्यक्त केला.
नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
कृती समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले, की देहूरोड कॅन्टोन्मेंट भागात नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून देहूरोडला स्वतंत्र नगर परिषद म्हणून मान्यता मिळावी, केंद्र सरकारने राज्य सरकारला नगर परिषद होणे कमी सूचना कराव्यात आदी मागण्या केल्या.
या वेळी यासंदर्भातील माणग्यांचे निवेदन संबंधित अधिकार्यांना देण्यात आले. देहूरोड शहर कॅन्टोमेंट कृती समितीने इशारा दिला आहे, की लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आंदोलनास भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
देहूरोडच्या नागरिकांची मागणी केंद्रीय मंत्री रामनाथ सिंह यांना भेटून सांगितली आहे, परंतु राज्य सरकारकडून केंद्राला जोपर्यंत प्रस्ताव पाठविला जात नाही तोपर्यंत केंद्र सरकार कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. असे राज्य आणि केंद्र सरकार हे आपल्या सगळ्यांच्या विचाराचे आहे. काम करणारे आहेत, परंतु देहूरोड कॅन्टोन्मेंटबाबत काही टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे एक शिष्टमंडळ तयार करुन देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामनाथ सिंह यांना भेटून यावर चर्चा केली जाइल.- श्रीरंग बारणे, खासदार
देहूरोड शहरातील प्रत्येकाचा विकास होणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे हक्काचं घर मिळालं पाहिजे, तुमचं नाव मतदार यादीत यायला पाहिजे, तुम्हाला प्रत्येक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी राज्यातील नेते आणि केंद्रातील मंत्री यांच्याबरोबर पत्रव्यवहार करुन काय मार्ग निघतोय हे पहावे लागेल. तुमचा जो निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही असणार आहोत.-सुनील शेळके, आमदार
देहूरोडमधील नागरिकांना इतर शहरांप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाईल. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि आपण स्वतः एकत्र असलेले शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली जाइल. नागरिकांच्या मागण्यांचा प्रस्ताव 31 ऑगस्टच्या आत हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाईल.- संजय भेगडे, माजी राज्यमंत्री