पिंपरी: चिंचवड येथील प्रदीप स्वीट्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने केलेल्या कारवाईतील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्यास धोकादायक अथवा असुरक्षित असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
एफडीएच्या पथकाने चिंचवड येथील प्रदीप स्वीट्सची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान दुकानातील काही खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने त्यांच्या दर्जा व सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. १) दैनिक पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेमध्ये 'आरोग्यासाठी धोकादायक खाद्यपदार्थ सापडले' असा उल्लेख अनावधानाने प्रसिद्ध झाला आहे.
प्रत्यक्षात प्रदीप स्वीट्समधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वी संबंधित खाद्यपदार्थ धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
प्रदीप स्वीट्समधील तपासणीदरम्यान काही खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित खाद्यपदार्थ धोकादायक असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत स्पष्टता येईल. अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- संजय चट्टे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन