खराळवाडी: सध्या फोनवर बोलून नागरिक एकमेकांशी संवाद साधताना सर्रासपणे दिसतात. या आधुनिकीकरणामुळे टपाल पत्राची वाट बघत बसायची वेळ आता संपली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे पत्राची वाट पाहत बसण्यापेक्षा नागरिक आता भ्रमणध्वनीवर आपली खुशाली थेट कळवतात.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, व्हाॅट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक मेसेजने घेतली आहे. त्यामुळे लाल रंगाची पत्रपेटी आता दुर्मीळ झाली आहे. ज्या पेट्या आहेत त्या धूळ खात पडलेल्या आहेत.
ऑनलाइनच्या जमान्यात पत्रव्यवहार दुरावला
पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत असताना परस्पर संवादाची साधने बदलली आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती होऊन सर्वांचे जीवन बदलले आहे. प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा. आता मात्र, तो कुठेही दिसेनासा झाला आहे.
पोस्टमन यातील सारी पत्र एकत्र करुन पुढे पाठवत असे. आज मात्र ऑनलाइनच्या जमान्यात नवीन संशोधनात हा पत्रव्यवहार काहीसा दुरावला आहे. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती.
पत्राचे महत्त्व झाले कमी
काही वर्षांपूर्वी पत्र आले का ? अशी विचारणादेखील पोस्टमनकडे केली जायची. पूर्वी पत्राला खूप महत्त्व होते. त्यामुळे नोकरभरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारेच मिळायचे.
त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकरभरतीची ऑर्डर, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटिशी, मनिऑर्डर, सर्व प्रकारचे निरोप पोस्टमनमार्फत मिळत असत, परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटी दिसेनाशी झाली आहे.
नागरिक पत्राऐवजी भ्रमणध्वनीवर जास्त बोलताना दिसतात. मेसेज पाठवतात म्हणून पत्रांची संख्या खूप कमी झाली आहे.- विजय साळवी, नागरिक
पत्रपेटी दररोज उघडली जाते. मात्र, पोस्टाच्या बाहेरील पत्रपेटीत कमी पत्र असतात. पोस्टाच्या आवारातील पत्रपेटीत पत्राचे प्रमाण जास्त आहे.- के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी, डाक विभाग