भाजपवर कुरघोडीसाठी राष्ट्रवादी आक्रमक Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra Politics: भाजपवर कुरघोडीसाठी राष्ट्रवादी आक्रमक

पिंपरी-चिंचवडची राजकीय हवा पालटल्याने पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: इतके दिवस गप्प असलेला आणि महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार होऊन बॅक फूटवर गेलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झाला आहे. महापालिकेच्या डीपीविरोधात महामोर्चा काढून राष्ट्रवादीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यातून सत्ताधारी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडची राजकीय हवा पालटल्याने पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहे. महापालिकेत भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी कोमात गेल्याची चर्चा होती. (Latest Pimpri News)

भाजप सत्तेत असल्याने शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसून येत नव्हते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी अजित पवारांची साथ सोडत 20 ते 25 माजी नगरसेवकांना घेऊन शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली होती. पक्ष फुटीमुळे पक्षात कोणी राहिले नसल्याने पक्ष मोडकळीस आला होता. शहराच्या इतिहासात प्रथमच अनेक महिने पक्षाचे शहराध्यक्षपद रिकामे होते. ही पक्षासाठी मोठी नामुष्की होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पक्षाला बळ मिळाले. महापालिका निवडणूक महायुती होणार की स्वबळावर लढणार, याचे दावे प्रतिदावे करण्यात आले. महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी हे प्रमुख दोन पक्ष आमनेसामने आले आहेत. सत्तेच्या बाहेर तब्बल नऊ वर्षे राहिल्याने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सत्ता मिळविण्यासाठी सरसावले आहेत. पक्षात नवीन उत्साह वाढविण्यासाठी डीपी विरोधात महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला.

निवेदन स्वीकारण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक हजर नसल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या पायर्‍यावर ठिय्या मांडला. उपाध्यक्ष येणार याची आयुक्तांना कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे ते विभागीय आयुक्तांच्या बैठकीस गेले होते. उपाध्यक्ष मोर्चासोबत आल्याने व आयुक्त यावेळी उपस्थित नसल्याने राजशिष्टाचार राखला गेला नाही, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. आयुक्त नसल्याच्या मुद्दा राष्ट्रवादीने लावून धरला आहे.

दुसरीकडे, भाजपसाठी डीपीचा मुद्दा संपला आहे. त्यावर मुख्यंमत्री निर्णय घेणार असल्याचे स्थानिक पदाधिकारी व आमदारांनी स्पष्ट केले आहे. डीपीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. शहरातील चिखलीनंतर चर्‍होली भागात टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे रद्द केला. तसेच, आळंदी तीर्थक्षेत्राशेजारील मोशी भागातील कत्तलखान्याचे आरक्षणही मुख्यमंत्र्यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे स्थानिक भाजपत जोश आहे.

आता भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू असून, उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे.

राष्ट्रवादीची महायुतीसाठी धडपड?

भाजप स्वबळावर लढण्यासाठी तयारी करीत आहे. तर, शहरातील पक्षाची पडझड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष महायुतीच्या बाजूने आहे. त्याला भाजपकडून प्रतिसाद दिला जात नाही. महापालिकेतील सत्तेत वाटा देण्यास भाजप तयार नाही. भाजपावर दबाव वाढविण्यासाठी तसेच, महापालिका आयुक्तांवर निशाणा साधण्यासाठी महामोर्चाचे आयोजन केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कितीपत यश मिळते हे, महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात स्पष्ट होणार आहे.

विधिमंडळ अधिवेशनातील चर्चेत नाही सहभाग

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डीपीवर जोरदार चर्चा झाली. भाजपच्या आमदारांनी त्यावर जोरदारपणे मत प्रदर्शन केले. त्या चर्चेत विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सहभाग घेतला नाही. हरकतीची मुदत संपल्यानंतर 25 दिवसांनी डीपीचा मुद्दा काढून बनसोडे महामोर्चात सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहर विकासासाठी भाजप डीपीसोबत

सत्तेतील भाजपकडून डीपीचे स्वागत केले जात आहे. शहराचा नियोजबद्ध विकासासाठी डीपी आवश्यक आहे. वाढत्या शहरासाठी पार्किंग, प्रशस्त रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक, बीआरटी, रुग्णालय, मैदान, उद्यान, शाळा, व्यापारी संकुल आदींचे आरक्षण अत्यावश्यक आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या घरांवर टाकलेली अन्यायकारक आरक्षणे रद्द करण्याची पक्षाची मागणी आहे. चुकीच्या आरक्षणांना पक्षाचा विरोध कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT