पिंपरी : महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी पहिल्याच सभेत आरोप-प्रत्यारोपांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्ष भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका केल्यानंतर दुसर्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरीच्या मैदानात उतरणार असल्याने महापालिकेसाठी राजकीय धुलवड सुरू झाली आहे.
पालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे काम सुरू झाले असतानाच मंगळवारी एकाच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे जंगी कार्यक्रम शहरात झाले. लोकसभा आणि विधानसभेत पराभव पत्करावा लागल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच सभा झाली. सर्व जागा लढविणार असल्याचे सांगत त्यांनी इच्छुकांमध्ये उत्साह वाढविला आहे. शहराच्या राजकारणात जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगत त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेत तगडे आव्हाने देण्याचे सुतोवाच केले. याचदिवशी अजित पवार यांनी ठरवून भोसरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला खरा, मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट अथवा महाआघाडीवर थेट कोणतीही टीका करण्यापेक्षा भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांना लक्ष्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याने भाजप आणि महायुतीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या.
यापूर्वी शहरातील भाजपची राजकीय कोंडी झाल्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी झंझावाती दौरा काढून मळभ दूर केलेले आहे. राष्ट्रवादीच्या कालच्या दोन्ही सभांमध्ये भाजपवर झालेली कूरघोडी उलटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवार यांनी थेट आणि अजित पवारांनी अप्रत्यक्ष भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेला ते कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आपला काळ परत आणायचा, असे सांगत अजित पवार यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छेला वाट करून दिली. विकासासाठी भाजपसमवेत असलो तरी पक्षाची मूळ विचारधारा सोडलेली नाही, असे सांगत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तोंडसुख घेतले. पार्टनरशिप करा, पण चांगल्या लोकांबरोबर करा, असे वक्तव्यही त्यांनी केले. महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याच्या घोषणा केल्या जात असताना इकडे भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केल्याने अजित पवारांना आपला काळ.. भाजपला बरोबर घेऊन आणायचा आहे की, सोडून? याबाबतची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडणार्या अजित गव्हाणे आपल्या समर्थकांसह स्वगृही परतले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी शरद पवारांनी नव्या शिलेदारांना साद घातली. सत्तेसाठी भाजपसमवेत जाणार नाही आणि शहरात राजकीय व्यवसाय करणार्यांना धडा शिकवा, असे सांगून त्यांनी लोकभावना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. या घडामोडीमुळे सहाजिकच दोन्ही गटाचे महत्त्व वाढले आहे. सध्या शहरामध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत महायुती न झाल्यास महत्त्व वाढलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या तगड्या आव्हानाला भाजपला सामोरे जावे लागू शकते, असे संकेतही मिळत आहेत.