संतोष शिंदे
पिंपरी: मोबाईल वापरकर्त्यांचा विश्वास असलेल्या गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल स्टोअरवरही आता फसवणूक करणारी अॅप्स खुलेआम उपलब्ध होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मागील पंधरा दिवसांत गुगलशी संवाद साधत तब्बल पाच फसवे अॅप्स हटविले आहेत.
ही मोठी कारवाई ठरली असून, नागरिकांनी मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाऊनलोड करताना अधिक सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Pimpri News)
सायबर पोलिसांनी संबंधित फसव्या अॅपची सखोल चौकशी केली असता या अॅप्सना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे या अॅप्सवरील संशय आणखी बळावला. यानंतर सायबर पोलिसांनी अधिकृत प्रक्रिया राबवत गुगलशी पत्रव्यवहार करून संबंधित अॅप्स हटवले आहेत.
लोन आणि गुंतवणूक अॅप्सचा धोका वाढला
सायबर पोलिसांकडे लोन अॅप्स आणि इन्व्हेस्टमेंट अॅप्समुळे फसवणुकीच्या तक्रारींची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषतः कॉलेजमधील तरुण, बेरोजगार युवक, गृहिणी अशा वर्गांना या अॅप्सच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. प्रोसेसिंग फी, जीएसटी, ट्रान्झॅक्शन शुल्क अशा सबबी देत पैशांची उकळपट्टी केल्यानंतर युजरला अॅपवरून ब्लॉक केले जाते. ही अॅप्स कोणत्याही अधिकृत बँक किंवा गुंतवणूक संस्थेशी संबंधित नसतात. आकर्षक रचना, खोट्या ऑफर्स आणि बनावट रेटिंगमुळे स्टोअरवर दिसतात.
विश्वासार्हतेच्या आडून फसवणूक
सायबर फसवणुकीचे स्वरूप अधिकाधिक गुंतागुंतीचे होत असून, सायबर गुन्हेगार आता थेट गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल स्टोअरसारख्या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर फसवे अॅप्स अपलोड करून नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचा आभास निर्माण करीत आहेत. त्यामुळे स्टोअरवर अॅप आहे म्हणजे ते अधिकृत आणि सुरक्षित आहे, हा समज नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
पोलिस तपासात उलगडा
पिंपरी-चिंचवड येथील एका नागरिकाने प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेले अॅप अधिकृत समजून ते डाऊनलोड केले. त्यातून त्यांची फसवणूक झाली. तपासादरम्यान ही बाब उघड झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तत्काळ गुगलशी पत्रव्यवहार सुरू करून संबंधित पाच अॅप्स हटविले आहेत. याशिवाय आणखी चार संशयित अॅप्स हटविण्यासाठी प्रक्रियेला गती देण्यात आल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात आले.
हटविण्यात आलेली अॅप्स
CreditLens
Racpmta
RPMTA
CreditPilot
Reba Cash
या संशयित अॅप्स असून, नागरिकांनी सावध राहावे
KeeCredit : Financial Assistance
SC Elite Vip
LumainMax
Exconversion