पिंपरी: माण परिसरात पीएमआरडीएच्या रस्तारुंदीकरणानंतर करण्यात येणार्या राडारोडा हटवण्याच्या कामात अडथळा आणणार्या दोघांची अखेर पोलिसांनी उचालबांगडी केली. आधी मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या, अशी मागणी करत ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 6) ठिय्या आंदोलन केले होते. या वेळी दोघेजण अधिकार्यांशी हुज्जत घालत होते. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावरच प्रशासनाची कार्यवाही सुरळीत पार पडली.
गुरुवारी (दि. 7) सकाळी दहाच्या सुमारास हिंजवडी-माण रस्त्यावरील पांडवनगर येथे पीएमआरडीएच्या पथकाने राडारोडा हटवण्याची मोहिम सुरू केली. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपायुक्त यांच्यासह अधिकारी व मजूर मोठ्या बंदोबस्तात दाखल झाले. मात्र, स्थानिक जागा मालकांनी या कामात अडथळा निर्माण करत ठिय्या आंदोलन केले. (Latest Pimpri News)
पथकातील कर्मचार्यांशी शाब्दिक वाद घालणार्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनाही अरेरावी केली. त्यामुळे पोलिसांनी कामात अडथळा आणणार्या दोघा ग्रामस्थांची दुपारी दीडच्या सुमारास उचालबांगडी करत ताब्यात घेतले. संध्याकाळी सहा वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, घटनास्थळी आमदार शंकर मांडेकर यांनी धाव घेतली. त्यांनी अधिकार्यांशी व ग्रामस्थांशी चर्चा करत समन्वय साधला. पीएमआरडीए आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार, संबंधित जागाधारकांना टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.
मोबदल्यावरून स्थानिकांचा विरोध
हिंजवडी आयटी पार्कसह परिसरातील विकास प्रकल्पांमुळे रस्ता रुंदीकरण आवश्यक बनले आहे. उभा पार्श्वभूमीवर पीएमआरडीए प्रशासन सातत्याने कारवाया करत आहे. मात्र, मोबदल्याच्या मुद्द्यावरून स्थानिकांचा विरोध अधूनमधून आढळून येतो. या वेळी पोलिसांना वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागत आहे.