पिंपरी: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचबरोबर वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे, आंदोलने आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) सकाळी सांगवी येथील मोकळ्या मैदानात जमावबंदी हाताळण्याचा सराव (मॉक ड्रिल) केला. या सरावात गोळीबार, हातगोळे फेकणे, अश्रुधुर नळकांड्यांची चाचणी अशा सर्व उपाययोजना प्रत्यक्षात करून पाहण्यात आल्या.
हिंसक जमावाला काबू करत जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून नेमके कोणते पाऊल उचलले जाईल, याचे सरावादरम्यान प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हवेत गोळीबार करून जमाव मागे हटविणे, अश्रुधुर नळकांड्या फोडून परिसर रिकामा करणे, तसेच हातगोळ्यांचा वापर करून जमाव विखुरण्याची प्रक्रिया यावेळी राबविण्यात आली. पोलीस पथकांनी विविध दिशांनी वेगाने तैनात होत जमावबंदी नियंत्रणाचे तंत्र पुन्हा एकदा तपासून पाहिले. (Latest Pimpri News)
सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल
मागील काही महिन्यांत विविध मागण्यांसाठी राज्यभर निघालेल्या मोर्च्यांमुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अशा घटनांचा अनुभव लक्षात घेऊन ही पूर्वतयारी करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
“गणेशोत्सव आणि मोर्चे-आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. जमावबंदीच्या प्रसंगी पोलिसांनी कोणते तांत्रिक व कायदेशीर उपाय करावेत, याचा हा सराव आहे. नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवत कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, हे यामागचा उद्देश आहे. अशा सरावामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत पोलिसांचे काम अधिक सक्षमपणे पार पाडता येते.- सुनील कुराडे, सहायक आयुक्त, पिंपरी- चिंचवड.