

भोसरी: येथील महापालिकेच्या भोसरी सहल केंद्र आवारात भटक्या कुत्र्यांनी चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी व दुपारी भटकंतीसाठी येणारे विद्यार्थी, खेळाडू, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या त्रासाबद्दल महापालिका प्रशासनाने ठोस कारवाई करत या भटक्या कुत्र्यांच्या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महापालिकेच्या वतीने भोसरी येथे नागरिकांसाठी भोसरी सहल केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथे सकाळी नागरिकांची गर्दी असते; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी परिसरातील भटकी कुत्री बिनधास्तपणे वावरत आहेत. (Latest Pimpri News)
त्यामुळे फेरफटका व व्यायामासाठी येणाया ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांची झुंडी परिसरात सतत फिरत असतात. ही सर्व कुत्री सहल केंद्राचा प्रवेशद्वार तसेच परिसरात घोळक्यात असतात. कोणी नागरिकांनी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते अंगावर धावून जातात. फेरफटका मारताना ही भटकी कुत्री अंगावर धावून येत असल्याचे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी सांगितले आहे.
परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात असूनही प्रशासन कोणतीही कारवाई न करता याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. काही नागरिक कुत्र्यांसाठी अन्न व बिस्किटे घेउन येतात. परिणामी परिसरात दिवसोंदिवस मोकट कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे.
- एक ज्येष्ठ नागरिक
सहल केंद्रातील भटक्या कुत्र्यांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल. तसेच, आवारातील कुत्री बाहेर काढण्यात येतील. कुत्रे पकडणारे पथक पाठवून उपाययोजना करण्यात येईल.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका