पळा पळानिवडणूक आली! तडीपार, स्थानबद्ध, मोका कारवाईसाठी पोलिस सरसावले File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Police: पळा पळानिवडणूक आली! तडीपार, स्थानबद्ध, मोका कारवाईसाठी पोलिस सरसावले

दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांवर धरपकड सुरू

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, मतदारांमध्ये दहशत पसरू नये आणि मतदानप्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरभर सर्च-ऑपरेशन व प्रतिबंधात्मक कारवायांची मालिका सुरू केली आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या परिपत्रकानुसार सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  (Latest Pimpri News)

संवेदनशील भागांची चाचपणी

यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रे, उमेदवारांचे कार्यालय परिसर, वादग्रस्त ठिकाणे, सीमाभाग याठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे. त्यासाठी संवेदनशील भागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. फुट पॅट्रोलिंग, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, ड्रोन निगराणी यांचा वापर करून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेला गती दिली आहे. संशयास्पद हालचाली, जातीय किंवा सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे प्रकार दिसताच तातडीने गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन

मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. अवैध दारूवाटप, धमकावणे, पैसे वा मालवाटप, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शस्त्रबंदी लागू

आचारसंहिता लागू झाल्यानंतर परवानाधारकांनी आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करणे बंधनकारक आहे. आर्म्स अ‍ॅक्ट, 1959 नुसार संवेदनशील भागांत शस्त्रबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. उल्लंघन करणार्‍यांवर परवाना रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहेत.

गोपनीय पथके अ‍ॅक्टिव्ह मोडवर

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक भूमिका घेतली आहे. कायदाभंग, गोंधळ घालणे, मतदारांना धमकावणे, रोख वा मालवाटप करणे, न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करणे हे सर्व थेट कारवाईच्या कक्षेत येणार आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांची धरपकड, मागील काळातील रिपीट ऑफेण्डर्सवर टेहळणी, तसेच तडीपार, स्थानबद्ध व मोका अशा तरतुदींची अंमलबजावणीसुरू झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

शहरातील सराईत गुन्हेगार, टोळीप्रमुख, दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांत सामील असलेले, फरार किंवा जामीन, पॅरोल, फर्लोवर असलेले तसेच बाहेरगावाहून आलेले संशयित या सर्वांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अशा सर्व व्यक्तींची यादी तयार करून त्यांना थेट पोलिस ठाण्यात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधितांकडून स्थानबद्ध/बंधपत्र घेण्याचे निर्देश असून, अटीभंग केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, आवश्यकतेनुसार सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर केले जाणार आहे. तसेच, गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांत संबंधित गुन्हेगारी टोळ्यांवर मोका लावण्यासाठी प्रकरणे वेगळी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वॉरंट-समन्स बजावणीला गती

निवडणूक काळात प्रलंबित राहिलेले गुन्हेगार न्यायालयीन प्रक्रियेपासून सुटू नयेत म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. विविध न्यायालये आणि प्राधिकरणांकडून जारी झालेले वॉरंट्स व समन्स यांची बजावणी प्रलंबित राहिलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे दीर्घकाळ लांबणीवर पडलेल्या गुन्ह्यांची कायदेशीर प्रक्रिया वेगवान होणार आहे.

अवैध धंद्यांवर धाडसत्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार्‍या अवैध दारूविक्री व वितरणावर पोलिसांचा बडगा उगारला गेला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अंतर्गत मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद राहील.

अवैध दारू विक्री, साठेबाजी आणि बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी छापेमारी मोहीम सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी, सापळे लावण्यात येत असून, परवानाधारक आस्थापनांवरही कडक देखरेख ठेवण्यात येत आहे. यंदा मतदारांना दारू वाटप होऊ नये, यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

जुन्या निवडणूक गुन्ह्यांचा मागोवा

मागील निवडणुकांदरम्यान नोंदविलेले गुन्हे व तक्रारी पुन्हा एकदा गतिमान करण्यात येत आहेत. संबंधित प्रकरणांचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर करण्याचे आदेश तपास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. यामुळे जुन्या निवडणूक गुन्ह्यांचे पुनरावृत्ती होण्यास आळा बसेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

निवडणुकीदरम्यान शहरातील शांतता अबाधित ठेवणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तडीपार, स्थानबद्ध आणि मोका सारख्या कठोर कायदेशीर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. पारदर्शक आणि सुरक्षित निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT