पिंपरी चिंचवड

PMRDA: पीएमआरडीएचा साडेसहा हजार सदनिकांचा नवा गृहप्रकल्प लांबणीवर?

मेट्रो प्रकल्पाबरोबरच हा प्रकल्पदेखील रेंगाळणार असल्याचे बोलले जात आहे

पुढारी वृत्तसेवा

PMRDA Housing Project Status May 2025

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या साडेसहा हजार सदनिकांचा टप्पा पूर्ण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षामध्ये 65 टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला डेडलाइन देण्यात आली आहे. एवढ्या कमी वेळेत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबरोबरच हा प्रकल्पदेखील रेंगाळणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेक सदनिका शिल्लक

पीएमआरडीएच्या वतीने सेक्टर 12 येथील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा टप्प्यातील गृहप्रकल्पाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 883 सदनिका उभारण्यात आलेल्या होत्या. यामध्ये सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, त्यात अनेक तक्रारी आणि नागरिकांचे आक्षेप होते. अद्याप त्याच्या तक्रारी काही सोडवल्या गेलेल्या नाहीत. परिणामी, या प्रकल्पामध्ये अनेक सदनिका शिल्लक राहिल्या होत्या.

त्यानंतर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने येथील सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्या. दुसर्‍या टप्प्यातील कामकाजाची गती वाढवण्यात यावी, अशी मागणी आहे. आवश्यक सर्व परवानगी आणि कागदपत्रांची पूर्तता करून 47 इमारतींचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्राधिकरणातील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गती वाढू शकला नाही.

गृहप्रकल्प 3, 4, 5 या प्रकल्पाखालील 11.63 हेक्टर क्षेत्र असणार आहे. या प्रकल्पात एकूण सदनिका 6 हजार 452 उभारण्यात येणार आहेत. अल्प, मध्यम व उच्च गटातील नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. या सदनिकांबरोबरच 83 कमर्शियल दुकाने उभारण्यात येणार आहेत.

वन बीएचके सदनिकेची

मागणी अधिकची असल्याने या सदनिका अधिक उभारण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी 730 कोटी रुपये खर्च येणार आहेत. 2023 पासून या कामाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.

पूर्ण झालेल्या घरातील त्रुटी दूर करा

सेक्टर 12 येथील काही सदनिकांबाबत नागरिकांकडून त्रुटी सांगितल्या जात होत्या. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर पाहणी समिती करून त्रुटी निश्चित करण्यात आल्या आहेत. सदनिकांमधील त्रुटी दूर करण्याच्या सूचना आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT