पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 20 नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) माध्यमातून पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. शेतकरी, नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर प्रारूप विकास आराखडा अर्थात (डीपी) रद्द करण्याची नामुष्की प्राधिकरण प्रशासनावर आली. त्यानंतर डीपीऐवजी टीपी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर्तास 21 पैकी 1 योजना रद्द झाली असून, त्यापैकी 15 योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
पीएमआरडीएचा विकास आरखाडयाच्या विरोधातील तक्रारीनंतर तो न्यायालयीन कचाट्यात सापडला होता. त्याचा निकाल लागण्यापूर्वीच मुख्यमंत्री तथा पीएमआरडीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करण्याच्या सूचना दिल्या. (Latest Pune News)
त्यानंतर त्यावर सर्व प्रक्रिया थांबवून न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्यात आले; मात्र न्यायालयाचा निर्णयाची प्रतीक्षा होती. डीपी रद्द झाल्यानंतर प्रामुख्याने शहरालगत असलेल्या गावांचा विकास करण्यास, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, या गावांची सुधारणा नगररचना योजनेच्या माध्यमातून करण्यात आली. माण- म्हाळुंगे टीपीच्या स्किमच्या धर्तीवर इतरही योजना राबविण्यात आल्या.
पीएमआरडीएच्या हद्दीत टीपी अंतर्गत कामकाजाला सुरुवात झाली असून, टीपीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के विकसित भूखंड मिळणार आहे. मूळ जागेवर अनुज्ञेय (परवानगी) असणारा एफएसआय 50 टक्के जागेवर वापरता येणार असल्याने या गावांचा बरोबरच नागरिकांना देखील त्याचा फायदा होणार आहे.
सर्व पायाभूत सुविधा या पीएमआरडीए पुरवणार आहेत. यासाठी असलेला निधी, भूसपांदन प्रक्रियादेखील राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पीएमआरडीएने आपल्या हद्दीत सहा ठिकाणी टीपी स्किमचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील माण-म्हाळुंगे, हवेली तालुक्यातील वडाचीवाडी, हांडेवाडी, मांजरी येथे प्रत्येकी एक, तर होळकरवाडी येथे दोन टीपी योजना राबविण्यात येणार होत्या. दरम्यान आणखी नव्याने 15 टीपी योजना प्रस्तावित आहेत. त्यांचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, त्या अनुषंगाने निविदादेखील काढल्या जाणार आहेत.
निधीची आवश्यकता भासणार
पीएमआरडीएच्या शहरालगतच्या 21 वेगवेगळया ठिकाणी टीपी स्किम राबविण्यात येणार आहे. त्यापैकी पीएमआरडीएकडून पाच तर, पुणे महापालिकेच्या वतीने दोन प्राथमिक नगर रचना योजनांचा आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यासाठी जवळपास 50 हेक्टर जागा व्यापली जाणार आहे. त्यापैकी पाच योजना मंजूर झाल्या आहेत. साधारण 100 एकरसाठी दीडशे कोटी रुपयांच्या आसपास निधी खर्च होतो.
वडाचीवाडी 2, औताडे हांडेवाडी 3, होळकरवाडी 4, होळकरवाडी 5, फुरसंगी 10 या नगररचना अंतर्गत जवळपास 750 हेक्टरवर ही योजना असून, त्यापैकी 50 हेक्टर हे रिंगरस्ता अंतर्गत येणार आहे. याला शासनाकडून मंजुरी मिळाल्या आहेत.
नव्याने टीपी
हवेली, मुळशी आणि मावळ या तिन तालुक्यातील वाघोली 2, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द 3, वडकी 2, माण, धामणे, गोंदुंबरे सांगवडे, बावधान बुद्रुक, दारुंबुरे, साळुंबे 2, वडाचीवाडी 2, औताडे हांडेवाडी 3, होळकरवाडी 9, फुरसुंगी 10 नव्याने घोषित टीपी स्किम आहेत. त्यसाठी अंदाजे क्षेत्र हे साडेबाराशे हेक्टर असणार आहे.
नगररचना योजनांची कामे सुरु आहेत. यामुळे शहरालगतच्या परिसराचे योग्य नियोजन होण्यासाठी मदत होऊ शकेल. 20 पैकी 4 योजना मंजूर झाल्या आहेत. इतर नव्याने 15 योजना असून, त्यासाठी मुदतवाढ घेण्यात येणार आहे. मार्च महिन्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल.- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, कार्यन्वित टीपी