PMRDA New Commissioner Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA New Commissioner: पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी; डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात बदली

नागपूर महापालिकेचे आयुक्त असलेले चौधरी आता पीएमआरडीएचे प्रमुख; रिंग रोड, मेट्रो व नदीसुधार प्रकल्पांचे मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत ते सध्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर, पीएमआरडीएचे सध्याचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. बदलीसंदर्भातील आदेश राज्य शासनाकडून बुधवार (दि. 4) सायंकाळी काढण्यात आला.

पीएमआरडीएच्या आयुक्तपदाचा पदभार डॉ. म्हसे यांनी तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते जून 2024 मध्ये स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी पीएमआरडीएच्या अनेक प्रकल्पांना गती दिली. सेक्टर 12 येथील गृहप्रकल्पांतील त्रुटीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट, मेट्रोच्या संथ कामांना गती देण्यासाठी कंत्राटदार कंपनीला नोटीस, अनधिकृत हॉटेल्स व होर्डिंगवर कारवाई यासोबतच अनधिकृत बांधकामांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.

दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चौधरी यांनी यापूर्वी सांगली, भंडारा येथे जिल्हाधिकारी; तसेच छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांना आता पुण्यातील पीएमआरडीए आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रस्तावित रिंग रोड, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो वेळेत धावणे, गृहप्रकल्प, इंद्रायणी, पवना आणि मूळा नदीसुधार प्रकल्प, 20 नगररचना योजना या कामांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT