पिंपरी: प्रवाशांच्या सोयीसाठी धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस आता चक्क फ्लायओव्हरवरच थांबून प्रवाशांना उतरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोसरी आणि हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या बीआरटी मार्गावरील टाटा मार्गाच्या फ्लायओव्हरवर बस थांबवून प्रवासी उतरविले जात असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पीएमपीएमएलच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील रस्त्यांवर पीएमपीएमएलच्या बस रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीच्या लेनमध्ये थांबवून प्रवासी चढविणे-उतरविणे ही बाब नवीन नाही. मात्र, आता हा प्रकार थेट उड्डाणपुलावरही होत असल्याने प्रवाशांसह अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. फ्लायओव्हरवर वाहनांचा वेग अधिक असतो. अशा ठिकाणी मोठी बस अचानक थांबल्यास मागून येणाऱ्या वाहनांना बसचा अंदाज येण्यापूर्वीच ब्रेक लावावा लागतो.
बस थांबली अन् वाहनांची रांग
नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलावर पीएमपी बस प्रवाशांची चढ-उतार करतात. मात्र अचानक बसगाड्यांनी थांबा घेतल्याने मागे वाहनांची मोठी रांग लागते. बसमधून प्रवासी उतरत त्यांना अपघाताचा धोका उद्भवू शकतो. बसगाड्या अचानक थांबल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावण्याबरोबरच लेन बदलताना वाहनांची एकमेकांना धडक होण्याचा धोका निर्माण होत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे. बसच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला अचानक बस थांबल्याचे लक्षात न आल्यास तो बसवर आदळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बाजूने अवजड वाहन येत असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
‘बसथांबा आहे की महामार्ग?
पीएमपीएमएलच्या बसने प्रवाशांना नियोजित बसथांब्यावरच उतरविणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीच्या नावाखाली चालकांकडून जिथे प्रवासी दिसतील तिथे बस थांबविली जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. रस्त्याच्या मधोमध बस थांबविण्यापासून सुरू झालेला हा प्रकार आता थेट फ्लायओव्हरपर्यंत पोहोचला आहे.
प्रवाशांच्या सुविधेपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची
बसमधील प्रवाशांच्या सुविधेसाठी शेकडो वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य, असा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
कारवाईची गरज
उड्डाणपुलावर वाहतूक सुरळीत ठेवण्याऐवजी बसच तेथे थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, तर संबंधित चालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या ठिकाणी बस थांबवायची, कोणत्या ठिकाणी प्रवासी उतरवायचे, याबाबत चालकांना स्पष्ट सूचना देण्याची गरज आहे. पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
उड्डाणपुलावर बस थांबवली की मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागतो. आम्ही वाहनचालक बसला ओव्हरटेक करताना जीव मुठीत घेऊन पुढे जातो. प्रवाशांना उतरविण्यासाठी सुरक्षित बसथांबा असताना उड्डाणपुलावरच बस थांबविण्याची गरज काय? एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का?मुकेश धीर