PMPML Bus Breakdown Pudhari
पिंपरी चिंचवड

PMPML Bus Breakdown: पीएमपी बसांचा प्रवास पुन्हा विस्कळीत; दररोज 50 हून अधिक बस बंद

बेकडाऊन वाढल्याने प्रवाशांचे हाल; देखभाल दुरुस्तीच्या अभावावर नागरिकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: शहरातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळख असलेल्या ‌’पीएमपी‌’चा प्रवास सुरळीत होईल की नाही, याचा भरवसा सध्या तरी राहिला नाही. कारण, कमी झालेले बेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. एप्रिल - मे महिन्यांत बसचे बेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवाशांना सेवा देण्यात येते. पीएमपीच्या अनेक बस शहरातील विविध भागांत पिंपरी, चिंचवड, निगडी या मार्गांवर धावतात. परंतु, यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त बस दररोज बेकडाऊन होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना निम्म्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते.

शहरातील मार्गावर धावणाऱ्या बसची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे त्याचे प्रमाण वाढत आहे. पीएमपी प्रशासनाकडून बेकडाऊन कमी करण्याचे वारंवार सांगण्यात येते. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बेकडाऊनमुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर दररोज दोन चार पीएमपी बस बंद पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे तिकीट दर वाढविण्यात आले असून, सेवा देण्यात पीएमपी अपयशी ठरत आहे.

ठेकेदारांच्या बसचे बेकडाऊन वाढले

पिंपरी, चिंचवड, निगडी, नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मोरवाडी, पिपरीगाव, भोसरी या मार्गावर धावणाऱ्या एकूण खासगी बसपैकी दैनंदिन 30 टक्के खासगी ठेकेदारांच्या बस रस्त्यामध्ये बंद पडत आहेत. एप्रिल ते मे महिन्यात अनेक बसचे बेकडाऊन झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बससेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या बेकडाऊनमुळे प्रवासी मात्र हतबल झाले आहेत.

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई

वाढत्या बेकडाऊनमुळे गेल्या आठवड्यात पीएमपी प्रशासनाने कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. शिवाय बेकडाऊनचे प्रमाण कसे कमी करता येईल याविषयी सक्त ताकीद दिली. यामध्ये ठेकेदारांबरोबर मीटिंग घेण्यात आली. तरीही रस्त्यावर बंद पडलेल्या बस दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीने तिकीट दर वाढविले. परंतु, प्रवाशांना सेवा देण्यात अपयश येत आहे. प्रवासात बेकडाऊन झाले, इंजिन बंद पडले, रस्त्यावर बसने पेट घेतला या व इतर कारणाने बस बंद पडत आहेत. याकडे पीएमपी प्रशासनाने लक्ष द्यावे.
सातीराम वडमारे, प्रवासी
उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे ऑईल लिकेज होणे, वायरिंग पघळणे यासारखे बिघाड होत असल्याने रस्त्यावर बस बंद पडतात. तरी पीएमपी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन, प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी लक्ष द्यावे.
भीमराव कांबळे, माजी सैनिक
कर्तव्य पार पाडताना रस्त्यावर बस फेल झाल्यावर प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येतात. त्यामुळे कामगारांना वेळेत पोहोचण्यासाठी गैरसोय होते. अशावेळी दुसऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी आमची रस्ता सुरक्षा पथक मदतीसाठी पुढे येऊन काम करते.
केशव गडपल्लू, रस्ता सुरक्षापथक अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT