हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: पीएमपीच्या बसगाड्यांच्या वाढत्या अपघातांमुळे पीएमपी प्रशासनाने चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षणाचा खर्च प्रतिचालक 1 हजार 400 रुपयांनुसार एकूण खर्च 48 लाख रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. मात्र, पीएमपी बसगाड्यांच्या वाढत्या अपघातांच्या घटनांवरून हे प्रशिक्षण केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान 45 अपघात झाले असून, यामध्ये 24 जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी नाळ म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवा होय. त्यामुळे नोकरी व कामानिमित्त विद्यार्थी, महिला, पुरुष, माथाडी कामगार, इत्यादी प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. त्यामुळे प्रवासी संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. प्रशासनाकडून सेवा देण्यात येणाऱ्या बस गाड्यांमध्ये स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्या धावतात. मात्र भाडेतत्त्वावरील बस चालवणाऱ्या चालकांचा मुजोरपणा वाढत आहे. त्यामध्ये सिंग्नलचे पालन न करणे, भरधाव बस पळविणे, थांब्यांवर बस न थांबविणे, बस चालविताना मोबाईलचा वापर करणे असे प्रकार पीएमपीच्या चालकांकडून केले जात असल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असून, जीवितहानीदेखील होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेनतंर प्रशासन जागे:
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांचे मागील वर्षीच्या तुलनेच यंदा अपघात वाढले आहे. यंदाच्या वर्षी प्राणांतिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षी मुंबई येथील कुर्ला परिसरात भरधाव बसमुळे झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 42 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. संबंधित घटनेत बसचालक अप्रशिक्षित असल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर पीएमपी प्रशासनास जाग येऊन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. दररोज 50 चालकांच्या एका तुकडीचे प्रशिक्षण नाशिक फाटा येथील केंदीय रस्ते वाहतूक संस्थेशी संलग्न आयडीटीआर संस्थेमार्फत देण्यात आले आहे. वाढते प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने प्रतिचालक 1 हजार 400 रुपयानुसार 48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. एवढा खर्च करूनही पीएमपी वाहकचालकांकडून अपघातांचे प्रमाण घटत नसल्याने वाहकांचे प्रशिक्षण नावासाठीच आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरातील प्राणांतिक अपघात पीएमपीच्या ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला; तसेच तिच्या सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली. ही घटना 9 डिसेंबर रोजी तळवडे-निगडी रस्त्यावर घडली. मी दररोज पीएमपीने प्रवास करत होतो; मात्र बेदरकार बस चालकांमुळे बसने प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे सध्या रिक्षाने जाण्यास प्राधान्य देतो.श्रेयस जाधव, प्रवासी
अपघाताची कारणे
प्रशिक्षण देऊनही वाहतूक नियमांचे उल्लंघन
वाहन चालवताना मोबाईलचा वाढता वापर
बस भरधाव पळविणे
पीएमपीच्या स्वमालकीच्या बसचा अपघात झाल्यास संपूर्ण चौकशी केल्यानंतर बसचालकाला निलंबित केले जाते. ज्या भागात अपघात झाला आहे. त्या भागातील वाहतूक पोलिसांना बोलवून त्यांच्याकडून प्रबोधन केले जाते. तसेच आमच्याकडून वाहकाला वेगळी ट्रेनिंग देण्यात येते. आणि प्रत्येक आठवड्याला वाहनचालकांची मिटींग घेण्यात येते. ज्या भागात अपघाताचे स्पॉट त्या भागात परिपत्रक लावण्यात आलेले आहे. त्या भागात धिम्या गतीने बस चालिवणे अशा सूचना वाहकांना देण्यात आलेल्या आहेत.यशवंत हिंगे वाहतूक व्यवस्थापक, पुणे