PM SHRI School Pudhari
पिंपरी चिंचवड

PM SHRI School: पालिकेच्या शाळांमध्ये हायटीच शिक्षणाचा नवा अध्याय; पीएमश्री योजनेत दोन शाळांची निवड

म्हेत्रेवाडी शाळेत हायटीच लॅब कार्यान्वित, पिंपळे गुरव येथे अंतिम टप्प्यात काम

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन शाळांची पीएम स्कूल फॉर रायजिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत निवड झाली आहे. यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले म्हेत्रेवाडी शाळा क्र. 92 याठिकाणी पहिल्या हायटीच लॅबचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळेतील मुलांना खासगी शाळांमधील मुलांप्रमाणे हायटीच लॅबद्वारे अभ्यासक्रमाचे धडे मिळणार आहेत, तर पिंपळे गुरव याठिकाणी या लॅबचे काम सुरु आहे. लवकरच पालिकेच्या दोन शाळा हायटीच लॅब शाळा म्हणून ओळखल्या जाणार आहेत. खासगी शाळांच्या दर्जाप्रमाणे या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.

काय आहे हायटीच लॅब ?

या लॅबमध्ये एक टीचर डेस्क आणि 24 स्टुडंट डेस्क आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासमोर डिजिटल स्क्रिन, हेडफोन, स्टायलस पेन, साऊंड सिस्टिम या सुविधा देण्यात आल्या आहेत. ई-पोडियम, गेट साफ्टवेअर या ॲप्लिकेशनच्या मदतीने मुलेही त्यांचा डेस्कवरील स्क्रीनचा वापर करून अभ्यासक्रमाच्या ॲक्टिव्हिटी करू शकतात.

ऑनलाईन चित्र काढणे, वाद्य वादनाचेही धडे

शिक्षक याठिकाणी त्यांच्या डेस्कवर त्यांचे अकाऊंट तयार करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्टिव्हीटीज शिकवितात. यामध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग, स्क्रिन शॉट, ड्रॉईंग टुल्स आदींचा समावेश आहे. याद्वारे विद्यार्थी चित्र काढणे, वाद्य वाजविणे देखील शिकू शकतात. मात्र, या सर्वांवर शिक्षक त्यांच्या इंटर ॲक्टीव्ह बोर्डद्वारे मुलांच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकतात.

लॅबचा अभ्यासासाठी उपयोग

या नावीन्यपूर्ण लॅबमध्ये इयत्ता 1 लीपासून ते इयत्ता 8 वीपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम ॲनिमेशन स्वरूपात तसेच प्रत्येक घटकावरील सराव प्रनोत्तरे व परीक्षा अशा स्वरूपात आहे. त्यामुळे अवघड घटक तसेच गणित, विज्ञानाच्या क्लिष्ट संकल्पना मुलांना सोप्या पद्धतीने समजावता येतात. यामध्ये खूप सारे प्रोग्राम मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्वविकासासाठी आहेत.

तज्ज्ञ व्यक्तींशी र्व्हर्च्युअल संवाद

मुलांमधील कलागुणांना वाव देणारे अनेक प्रोग्राम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ई-बुक्स आहेत. गट संवाद, व्हर्च्युअल सभा देखील शिक्षक घेऊ शकतात. शिक्षणातील एखादा तज्ज्ञ व्यक्तींशी ते र्व्हर्च्युअल मीटिंमध्ये बोलू शकतात. प्रश्नोत्तरे विचारू शकतात.\

काय आहे पीएमश्री योजना

पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळां या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. येत्या काळात या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख रुपये मिळणार आहेत. ही योजना पाच वर्षासाठी राबविली जाणार असून याअंतर्गत निवड झालेल्या शाळांचे आदर्श शाळेत रूपांतर होणार आहे. या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा असणार आहे.

शाळेमध्ये रोबोटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी लॅब

शाळांमध्ये हायटीच लॅब येण्यापूर्वी रोबोटिक्स आणि स्ट्रानॉमी लॅब देखील सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तम दर्जाच्या दुर्बिणी देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी अवकाश निरीक्षण करू शकतात. अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांचा अभ्यास करू शकतात. रोबोटिक्स लॅबमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प विद्यार्थी तयार करतात.

ऑनलाईन परीक्षा अन्‌‍ निकालही झटपट

या लॅबमध्ये शिक्षिक हे ऑनलाईन परीक्षा घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर हा शिक्षकांच्या डेस्कला त्यांना सोडविताना दिसतो. त्याचा डिजिटल निकालाही लगेच टीव्हीच्या मोठ्या स्क्रिनवर सादर करता येतो.

हायटीच लॅबमध्ये अभ्यासक्रम मुलांना कशाप्रकारे शिकवायचा याचे नियोजन आहे. पुस्तकाचा वापर न करता थेट डेस्कवर त्यांना सर्व गोष्टी हाताळता येणार आहेत. याचा वापर आता शिक्षक व विद्यार्थी करायला लागले आहेत. याचा आमच्या मुलांना खूप फायदा होणार आहे.
स्नेहल मोरे (मुख्याध्यापिका, म्हेत्रेवाडी मनपा शाळा)
पीएमश्री श्रेणीमध्ये पालिकेच्या दोन शाळांची निवड झाली आहे. म्हेत्रेवाडी शाळेत लॅबचे काम पूर्ण झाले आहे, तर पिंपळे गुरव याठिकाणी शेवटच्या टप्प्यात आले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना हायटीच शिक्षण मिळत आहे.
संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिं.चिं.मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT