वडगाव मावळ: चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चालू वर्षीचे सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या १४ पिकांसाठी मिळतो. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल. कापूस व कांदा या व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के राहील. या योजनेत भाग घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ऍग्री स्टाक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे. तसेच, जमिनीची कागदपत्रे, पीकलागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंटसाठी ते बँक खात्यात जोडलेले आवश्यक आहे व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे डिजिटल क्रॉप सर्वे करणे बंधनकारक आहे. योजनेत भाग घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण आल्यास शेतकरी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.