पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार सदस्यीय 32 प्रभाग रचनेचे नकाशे तयार करण्यात आले आहे. ते नकाशे मान्यतेसाठी मुंबई येथील नगर विकास विभागाकडे मंगळवारी (दि.5) सादर केले जाणार आहेत. नगर सचिव विभागाकडून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नकाशे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले जाणार आहेत. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रभाग रचना 22 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.
फेब्रुवारी 2017 नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आता होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहे. निवडणुकीबाबत इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. (Latest Pimpri News)
प्रभागरचना कशी असणार, या बाबत तर्कविर्तक लढविले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करुन उमेदवारांची यादीही तयार केली आहे. काही पक्षांकडून उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचे पथकाने 32 प्रभागांचे नकाशे तयार केले आहेत. प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी-दापोडी अशी उतरत्त्या क्रमाने करण्यात आली आहे.
त्यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.2) आणि रविवारी (दि.3) असे दोन दिवस संबंधित अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्यांसोबत बैठक घेऊन नकाशांबाबत त्रुटी व शंकांचे निरसन केले. तसेच, सखोल माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली की नाही यांची उलटतपासणी केली.
समितीने तयार केल्या प्रभाग रचनेवर आयुक्त सिंह यांची स्वाक्षरी झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे सोमवारी (दि.4) पाठविला जाणार होता. मात्र, त्या विभागाने मंगळवारी (दि.5) ची वेळ दिली आहे. सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे व त्यांचे पथक मंगळवारी नकाशे तसेच, आवश्यक माहिती नगर विकास विभागास सादर करणार आहे.
त्या विभागाच्या मंजुरीनंतर नकाशे राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जातील. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे 22 ऑगस्टला प्रसिद्ध केला जाणार आहे. त्याववर 28 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना घेतल्या जाणार आहे. त्यावर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाईल.
पिंपरी-चिंचवड शहराचा 32 प्रभाग रचनेच्या मसुदा तयार झाला आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा नगर विकास विभागाकडे मंगळवारी (दि.5) सादर केले जाणार आहे. त्या विभागांच्या अधिकार्यांकडून उपस्थित केलेल्या शंका व त्रुटीचे निरसन केले जाईल. त्या विभागानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका