

पिंपरी: सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यंदाही नावीन्यपूर्ण आकर्षक गणेशमूर्ती स्टॉल्सवर दिसून येत आहेत. विविध रूपातील मूर्ती पाहून भक्तमंडळी हरखून जात आहेत, तर शालेय गणवेशातील बाप्पाची मूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या काही वर्षातील गणेश मूर्तींवर चित्रपट व मालिकांचा मोठा प्रभाव होता. यंदा मात्र, चंद्र कोर, पृथ्वी गोलावर, मूषकावर, मोदकावर, पाटावर, गदेवर, सिंहासनावर विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती; तसेच पाळण्यात, पुस्तक वाचताना, झोक्यावर बसलेली, श्रीरामाच्या रूपात, स्वामी समर्थांच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात, बालाजीच्या रूपात, पेशवाई, शंकर पार्वतींसमवेत, बालगणेश रूपातील अशी नानाविध रूपातील मूर्ती स्टॉल्सवर दिसून येत आहेत. (Latest Pimpri News)
शालेय गणवेशातील मूर्ती
शालेय गणवेशातील ही मूर्ती यंदा नव्यानेच पहायला मिळत आहे. पाठीवर दप्तर घेवून शाळेत चाललेली मूर्ती चिमुकल्यांचे आकर्षण ठरत आहे. बाल गणेश मूर्ती ही नेहमीच लहानग्यांचे आकर्षण ठरलेली आहे. तसेच सोबत मूषकराज असलेली मूर्ती घेण्याचा आग्रह आई वडीलांकडे असतो. ही शालेय गणवेशात काखेत दप्तर, बुट आणि मोजे घातलेली गणेशमूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी काही आकर्षण
नारळावर बसलेला बालगणेश, ट्रॅक्टर चालविणारी मूर्ती, घोड्यावर मूषकराज सोबत बसलेली मूर्ती, बैलगाडी चालविणारी, मोटार चालविणारी अशा आकर्षक मूर्ती स्टॉलवर पहायला मिळत आहेत.