Pimpri Street Light Theft Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Street Light Theft: पिंपरी-चिंचवडमध्ये अर्बन स्ट्रीटवरील 100 हून अधिक दिव्यांची चोरी; शहरात खळबळ

महापालिकेच्या कोट्यवधींच्या सुशोभिकरण प्रकल्पाला धक्का; तीन ते चार ठिकाणी प्रकार उघड, पोलिसांत तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनेक मुख्य मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक बनवले आहेत. तसेच, सुशोभिकरण केले आहे. त्या प्रशस्त पदपथावरील आकर्षक खांबांवरील दिवे गायब झाले आहेत. चौकशी केली असता, शहरातील चार ठिकाणच्या तब्बल 100 ते 125 दिव्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या वतीने प्रशस्त रस्ते अरुंद करून अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम करण्यात येत आहे. दापोडी ते निगडी, थेरगाव, डांगे चौक, निगडी-प्राधिकरण, रावेत, आकुर्डी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, भोसरी, सांगवी फाटा ते किवळे, आळंदी रस्ता, पिंपरी, नेहरूनगर आदी ठिकाणी अर्बन स्ट्रीट डिजाईने पदपथ व सायकल ट्रॅक करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यावर आकर्षक बाके, विद्युत दिव्यांचे खांब तसेच, चित्ताकर्षक रचना करण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅकला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी जॉगिंग तसेच, वार्किंग तसेच, सायकलिंग करण्यासाठी नागरिक त्याचा वापर करत आहेत. तसेच, छायाचित्र व व्हिडिओ काढण्यासाठी नागरिक त्या आकर्षक पदपथाचा उपयोग करत आहेत. त्याचे अनेक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे.

मात्र, नव्याने तयार केलेल्या दापोडी ते निगडी मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर लावलेल्या आकर्षक विद्युत दिव्यांच्या खाबांवरील दिवे गायब झाले आहेत. त्यामुळे पदपथावर प्रकाश पडत नाही. परिणामी, पदपथ व सायकल ट्रॅक नितेज झाले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाकडे चौकशी केली असता, दिवे गायब होण्याचे प्रकार तीन ते चार ठिकाणच्या पदपथावर झाले आहेत. दिव्यांची चोरी झाल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील तसेच, नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून दिव्यांची चोरी झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिका कर्मचार्‍यांचा सहभाग?

महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून शहरात विद्युत दिव्यांचे काम केले जाते. ते कर्मचारी दिवे दुरुस्त करणे, बसवणे व काढण्यास तरबेज असतात. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचार्‍यांनी ते महागडे दिवे चोरल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. दिवे काढताना ते नेहमीचे कर्मचारी असल्याने त्यांना कोणी हटकले नसावे, असेही बोलले जात आहे.

पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे?

महापालिकेकडून शहरभरात 6 हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून खांबांवरील दिवे चोरणारे महापालिकेच्या हाती लागू शकतात. मात्र, महापालिकेचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे कॅमेरे केवळ शोभेचे ठरत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांत तक्रार

महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक विकसित केले आहेत. त्यावर आकर्षक रचनेचे विद्युत दिव्यांचे खांब लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते पदपथ नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, शहरातील तीन ते चार ठिकाणच्या पदपथावरील दिव्यांची चोरी झाली आहे. त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब लांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT