

पिंपरी: सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रिक्षा, ट्रॅक्सी आणि बसमध्ये पॅनिक बटण तसेच व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस लोकेशन (व्हीएलटीडी) बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र किंवा वाहतूक परवाना (परमिट) थेट रद्द केले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी प्रादेशिक परिवहन कार्यालय ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
सार्वजनिक सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये नोकरदारवर्ग, महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठेवत सर्वोच्च न्यायालयाने कठोर पाऊले उचलले आहे. तसेच केंद्र सरकारने यापूर्वीच सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी ही सुरक्षा यंत्रणा अनिवार्य केली होती.
मात्र अनेक राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येताच न्यायालयाने कडक पाऊले उचलली आहेत. सार्वजनिक सेवा म्हटले की, वाहनांमध्ये मोठी गर्दी होते. वाढत्या गर्दीमध्ये महिलांची छेडछाड असे प्रकार घडत असतात. किंवा प्रवाशाला धोका वाटला , आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वाहनातील पॅनिक बटण दाबता येते. हे बटण दाबल्यानंतर वाहनाचे अचूक लाईव्ह लोकेशन संकटाचा संदेश थेट पोलिस नियंत्रण कक्ष परिवहन विभागाकडे पोहचतो.
पॅनिक बटण कसे काम करते
सार्वजनिक वाहनांमध्ये व्हीएलटीडी म्हणजेच जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम आणि एक लाल रंगाचे पॅनिक बटन असते. प्रवासादरम्यान काही संकट आल्यास किंवा धोका जाणवल्यास प्रवाशाने ह्या बटणाचा वापर करावा.
वाहन ॲप व पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
वाहनधारकांनी ही उपकरणे बसविणे पुरेसे नाही. त्याची व्हीएलटीडी डिव्हाईसची आधिकृत नोंदणी परिवहन विभागाच्या केंद्रीय वाहन ॲप आणि पोर्टलवर असणे आवश्यक आहे. पोर्टलवर हे वाहन डिव्हाईस ॲक्टिव्ह दिसत नाही. तोपर्यंत वाहनाची शासकीय किंवा नूतनीकरणाची प्रकिया पूर्ण केली जाणार नाही.
सामाजिक सुरक्षेकडे महत्वाचे पाऊल
महिला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. प्रवासादरम्यान लोकांकडून होणारे गैरवर्तन, अपहरण किंवा होणाऱ्या छेडछाडीला रोख घालण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार आहे.
व्हीएलटीडीमुळे रिअल- टाइम लोकेशन कळणार
वाहनातील बसविण्यात आलेल्या व्हीएलटीडीमुळे वाहनाच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच व्हीएलटीडीमुळे वाहनाचे रिअल टाइम लोकेशन नियंत्रण कक्षाला दिसते. त्यामुळे वाहनांना ट्रॅक करण्यास मदत होती.
प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. व्हीएलटीडी आणि पॅनिक नसलेल्या वाहनांनी तात्काळ बसवून घ्यावे, अन्यथा फिटनेस प्रमाणपत्र किंवा परमिट नूतनीकरण दिले जाणार नाही.
राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन आधिकारी.
वाहनात पॅनिक बटन किंवा लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम असल्याने रात्रीच्या वेळेत प्रवास करताना महिलांमध्ये भिती निर्माण होणार नाही. महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षतितेसाठी योग्य निर्णय घेतला आहे.
शोभा बंब महिला.