Gun Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal Pistol Case: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक; पिस्तूल आणि काडतूस जप्त

नाणेकरवाडी एमआयडीसी रस्त्यावर खंडणीविरोधी पथकाची कारवाई; पिस्तूल पुरविणाऱ्या चाकणमधील तरुणासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बेकायदेशीर पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले आहे. तसेच, त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. नाणेकरवाडी एमआयडीसी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. चौकशीत पिस्तूल पुरविणाऱ्या आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश अनिल शिंदे (२२, रा. अवसरी खुर्द, आंबेगाव) आणि प्रज्वल सुधीर जाधव (२२, रा. जाधववाडी, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पिस्तूल पुरविल्याच्या आरोपावरून फारूक अन्सार पठाण (२५, रा. चाकण) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश आणि प्रज्वल यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकातील पोलिस अंमलदार चंद्रकांत जाधव, नीलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांना दोन्ही सराईत गुन्हेगारांकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती.

त्या आधारे पथकाने नाणेकरवाडी एमआयडीसी रस्त्यावर सापळा रचला. संशयित दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तूल आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी हे शस्त्र फारूक पठाण याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार, दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दक्षिण चाकण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT