Schools Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Teachers SIR Process: एसआयआरच्या कामात शिक्षक व्यस्त; पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम

मतदार यादी पुनरिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती; शाळांमध्ये मोजक्या शिक्षकांवर अध्यापनाची जबाबदारी, पालकांची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्यात एसआयआरप्रक्रिया ३० जूनपासून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेस आता १७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या या कामी महापालिका तसेच खासगी शाळांतील शिक्षकांची, बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांमध्ये सध्या घटक चाचणी परीक्षांचा कालावधी जवळ आला आहे, परंतु शिक्षक एसआयआरच्या कामात गुंतल्याने त्यांना अध्यापनास वेळ देणे मुश्किल झाले असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कोण पूर्ण करून घेणार, असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.

सध्या राज्यभर मतदार यादी विशेष पुनर्रिक्षणाचे काम सुरू आहे. अनेक शिक्षकांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेतील केवळ दहा टक्के शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती अपेक्षित आहे. काही ठिकाणी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक शिक्षक एसआयआरच्या कामात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.

मोजक्या शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी

काही शाळांमध्ये अठरा शिक्षकांपैकी तब्बल चौदा शिक्षक एसआयआरच्या कामावर असल्याचा दावा शिक्षकांकडून केला जात आहे. त्यामुळे उरलेल्या मोजक्या शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी येत आहे. अनेक ठिकाणी १ ली ते ४, ५ वी ते ८ वी असे वर्ग एकत्र करून अध्यापनाचे कामकाज सुरू आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसल्याने उरलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

शिक्षकांचे म्हणणे आहे, की एका बाजूला शासनाने दिलेली निवडणुकीशी संबंधित जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी लागते. तर, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडेही तितकेच लक्ष द्यावे लागते. मात्र, या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधणे कठीण होत आहे.

माहिती समजावून सांगण्यात वेळ जातो

दरम्यान, या प्रक्रियेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती झालेली नसल्याचाही मुद्दा शिक्षकांनी उपस्थित केलाय. अनेक नागरिकांना एसआयआर म्हणजे काय, त्याची गरज काय आणि नोंदणीची प्रक्रिया कशी आहे, याची माहिती नसल्यामुळे शिक्षकांचा बराच वेळ माहिती समजावून सांगण्यात जात आहे. शासनाने जाहिरात, प्रसारमाध्यमे आणि डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने अधिक व्यापक जनजागृती केली आहे. असे असले तरी शिक्षकांवरील हा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी झाला असता, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली जात आहे.

अभ्यास पुन्हा समजून घ्यावा लागतो

शिक्षक वर्गात फक्त एक ते दीड तास उपलब्ध असतात. त्या वेळेत शिकवलेला अभ्यास पुन्हा पुन्हा स्वतः समजून घ्यावा लागतो. पूर्वी एका दिवसात समजणारा धडा आता तीन दिवसांनंतरही पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शिक्षकांकडून प्रत्येक गोष्ट अधिक लक्ष देऊन समजून घ्यावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

एसआयआरचे काम आटोक्यात आले आहे. आम्ही बैठक घेऊन शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करण्याची मागणी करणार आहोत. शाळांमध्ये १५ ऑगस्टची तयारीदेखील करायची आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT