Pimpri Sangvi Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Sangvi Hospital: पिंपरी सांगवी महापालिका रुग्णालयात गर्दी; सोनोग्राफी व आयसीयू सुविधांचा अभाव

दररोज शेकडो रुग्णांचा ओघ; अपुऱ्या सुविधा आणि तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे नागरिक हैराण

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: महाालिकेच्या जुनी सांगवी रुग्णालय लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहे. याठिकाणी दररोज साधारणत: दीडशे ते दोनशे रुग्ण तपासणीसाठी येतात. सांगवी रुग्णालयात जुनी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी येत असतात. अपुऱ्या जागेमुळे विविध विभागांत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

सोळा खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त प्रसूती केली जाते. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ओपीडी, वैद्यकीय अधिकारी आहेत. ओपीडीमध्ये गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर उपचार आणि लसीकरणाची सुविधा आहे. सांगवी रूग्णालयात रुग्णांचा ओघ आहे. मात्र, त्यामध्ये गैरसोयींची भर पडत आहे. त्यामुळे रुग्णांना पालिकेच्या इतर रुग्णालयाकडे किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.

रुग्णालयात सोनोग्राफी नाही

रुग्णालयात फक्त प्रसूती केली जाते. गरोदर महिलांना दर महिन्याला सोनोग्राफी करावी लागते. मात्र, याठिकाणी सोनोग्राफी मशीन नसल्याने त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या महिलांना पालिकेच्या इतर रुग्णालयात जावून किंवा खासगी सोनोग्राफी केंद्रातून सोनोग्राफी करावी लागते. सोनोग्राफीसाठी महिलांना औंध जिल्हा रुग्णालय किंवा पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जावे लागते.

हे अंतर आणि वेळ यामुळे विशेषतः रात्री-अपरात्री गरोदर महिलांना खूप त्रास होतो. कधी-कधी आणीबाणीच्या वेळी सोनोग्राफीची गरज भासते; पण सुविधा नसल्याने रुग्णालयाबाहेर जावे लागते. पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने मानधनावरील डॉक्टरांना बोलावले जाते. आयसीयू, एनआयसीयू नाही रूग्णालयात फक्त प्रसुती केली जाते. यामध्येदेखील अतिजोखमीच्या गरोदर महिलां प्रसूतीसाठी आल्या तर आयसीयूची सुविधा नाही. तर, अनेक वेळा जन्मजात बालकाला एनआयसीयूची गरज लागते. अशावेळी वायसीएम किंवा थेरगाव रूग्णालयात पाठविले जाते.

अपुरी जागा

रुग्णालय बरेच जुने असल्याने त्या वेळी असलेल्या लोकसंख्येनुसार बांधण्यात आले होते. त्यानंतर सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सुविधांमध्ये वाढ केलेली नाही. अपुऱ्या जागेमुळे रुग्णांना प्रवेशव्दाराच्या बाहेर रस्त्याच्याकडेला वाहनांचे पार्किंग करावे लागते. लसीकरण मोहीम किंवा इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविताना येथे वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मुख्य रस्ता असल्याने वाहनांची या रस्त्यावरुन मोठी वर्दळ असते.

सोनोग्राफी मशीन उपलब्ध होईल; पण त्यासाठी सोनोग्राफी तज्ज्ञ उपलब्ध होत नाहीत. तज्ज्ञ नेमण्यासाठी पाहिजे तेवढी आर्थिक तरतूद नाही. रुग्णालय छोटे असल्याने आयसीयू आणि एनआयसीयू करता येत नाही.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT