Ration Card  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ration Card Verification: पिंपरीत ‘मिशन सुधार’चा धडाका; २,२०० शिधापत्रिकाधारकांची नावे कमी

लाभार्थ्यांची संख्या १६ हजारांवरून १३ हजार ८०० वर; पात्रता पडताळणी सुरू, उत्पन्नाचा अधिकृत पुरावा सादर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंत स्वस्त धान्याचा लाभ पोहोचविण्यासाठी शासनाकडून ‘मिशन सुधार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पिंपरी ज विभागात शिधापत्रिकाधारकांची पडताळणी करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे २ हजार २०० लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे पिंपरी विभागातील लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या सुमारे १६ हजारांवरून आता १३ हजार ८०० वर आली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखणे, अपात्र व्यक्तींकडून घेतला जाणारा स्वस्त धान्याचा लाभ थांबविणे आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या पात्रतेची तपासणी केली जात असून, शासनाने निश्चित केलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे.

या पडताळणी प्रक्रियेत कुटुंबाचे उत्पन्न, आयकर भरण्याची स्थिती, शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या सदस्यांची माहिती तसेच शिधापत्रिकेवरील नोंदींची तपासणी केली जात आहे. उपलब्ध शासकीय माहिती आणि संबंधित नोंदींच्या आधारे संशयित अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. त्यानंतर संबंधित यादी स्वस्त धान्य दुकानदारांकडे पडताळणीसाठी पाठविली जाते. प्रत्यक्ष कागदपत्रे आणि वस्तुस्थिती तपासल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते.

दरम्यान, काही लाभार्थ्यांच्या उत्पन्नाबाबत तसेच पात्रतेच्या निकषांबाबत शंका उपस्थित झाल्याने त्यांची स्वतंत्रपणे छाननी केली जात आहे. केवळ प्राथमिक यादीत नाव आल्याने संबंधित लाभार्थी अपात्र ठरत नाही. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि संबंधित विभागाची पडताळणी महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यावर भर

या मोहिमेमुळे पिंपरी विभागातील शिधापत्रिकाधारकांची माहिती अद्ययावत होण्यास मदत होत आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून पात्र कुटुंबांपर्यंत धान्याचा लाभ पोहोचविणे आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

कामकाजाच्या वेळेबाबत संभ्रम

शिधापत्रिका कार्यालयाबाहेर कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी १ अशी नमूद करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर कर्मचारी कामकाज करत असल्याने काही नागरिक कार्यालय बंद असल्याचे समजून माघारी जात आहेत. याबाबत कार्यालयाने सांगितले, की सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नागरिकांची प्रत्यक्ष कामे केली जातात. त्यानंतर अंतर्गत कामकाज केले जाते. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या गरजू नागरिकांनाही आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाते.

शिधापत्रिकाधारकांच्या पात्रतेची छाननी सुरू आहे. मात्र, या मोहिमेबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. अधिक काटेकोर पद्धतीने व कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत ही प्रक्रिया राबवावी लागेल.
प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे
ज्या लाभार्थ्यांची नावे पडताळणीच्या यादीत आली आहेत, त्यांनी आपल्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा संबंधित कार्यालयात सादर करावा. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची नावे योजनेत कायम ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
प्रदीप डंगारे, परिमंडळ अधिकारी, ज विभाग, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT