Pimpri Chinchwad Election Police pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Election Police: महापालिका निवडणुकीआधी पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई! 1,600 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा

गोंधळ घालणाऱ्या 159 बड्या गुन्हेगारांची स्वतंत्र ‘कुंडली’ तयार; राजकीय नेत्यांचाही यादीत समावेश, संवेदनशील बूथवर विशेष लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर मायक्रो प्लॅनिंग सुरू केले आहे. यामध्ये शहरातील दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 1,600 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. निवडणुकादरम्यान वातावरण बिघडवू शकणाऱ्या सुमारे 159 महत्त्वाच्या गुन्हेगारांची ‌‘कुंडली‌’ स्वतंत्ररीत्या तयार करण्यात आली आहे.

गुन्हेगारांच्या यादीत नेते मंडळीही

निवडणुकीपूर्व वातावरण बिघडू नये, म्हणून पोलिसांनी तयार केलेल्या 159 महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या यादीत काही राजकीय नेत्यांचीही नावे असल्याचे समोर आले आहे. या नेत्यांचा पूर्वीच्या वादांत सहभाग, त्यांच्या समर्थकांची गर्दी, निवडणूक काळात निर्माण होणारा तणाव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या सर्व बाबींचा विचार करून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. काही जणांवर तर पाच पेक्षा जास्त गुन्हे आहेत.

गुन्हे शाखेची स्वतंत्र छाननी

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शहरातील कुप्रसिद्ध व वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार केली आहे. या यादीतील प्रत्येकाला कार्यालयात बोलावून प्रत्यक्ष तंबी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येकाच्या पूर्वइतिहासाचा सविस्तर अभ्यास करून त्यांच्या हालचाली, साथीदार, भांडण-विवादातील सहभाग आणि निवडणूक काळात निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका याचा आढावा घेतला जात आहे. तंबी देताना ‌‘निवडणूक काळात गैरप्रकार केल्यास तत्काळ कठोर कारवाई होईल‌’, असा स्पष्ट इशारा देण्यात येत आहे.

संवेदनशील बूथची पुन्हा छाननी

मागील निवडणुकांत झालेल्या वाद, गोंधळ आणि बूथकब्जा प्रयत्नांचा सखोल अभ्यास करून संवेदनशील केंद्रांची नव्याने छाननी करण्यात येत आहे. हिंजवडी, सांगवी, भोसरी, वाकड-थेरगाव आणि पिंपरी बाजार परिसरातील काही बूथ ‌‘अत्यंत संवेदनशील‌’ म्हणून ओळखले गेले असून तेथे अतिरिक्त फोर्स, गस्त आणि सीसीटीव्ही मॉनिटरिंग कसे ठेवावे, याबाबत आढावा सुरू आहे.

गत निवडणुकांचा अभ्यास आधारभूत

सन 2017 महापालिका निवडणुकांत शहरात अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आणि गटबाजीचे प्रकार घडले होते. त्या घटनांचे दस्तऐवजीकरण पुनरावलोकन करून यंदा त्या भागात अधिक पोलिस, वाहतूक नियंत्रण आणि त्वरित प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

गुन्हेगार सैरभैर

पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यास सुरुवात करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काही गुन्हेगारांनी गुन्हेगारी हालचाली थांबवल्या, तर काहींनी शहर सोडण्याचा पर्याय निवडला आहे. निवडणूक काळात कुठलीही गडबड झाली तर तात्काळ कारवाई होईल, हा संदेश स्पष्टपणे गुन्हेगारी टोळक्यात दिला गेला असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात सर्वंकष नियोजन सुरू आहे. गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून, कोणाचीही गय केली जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT