पिंपरी: पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला रविवारी सकाळी अचानक आग लागून बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १५ प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना सकाळी पावणे बाराच्या सुमारास लोखंडे कामगार भवनासमोर घडली.
अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पीएमपीएमएलची बस पिंपरीहून भोसरीच्या दिशेने निघाली होती. यावेळी बसमध्ये चालक, वाहक आणि १५ प्रवासी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर बस नेहरूनगरकडे जात असताना लोखंडे कामगार भवनाजवळ बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.
या बसमध्ये यांत्रिक दरवाजे असल्यामुळे दरवाजा उघडण्यास वेळ लागू शकत होता. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने दरवाजे उघडले आणि प्रवाशांना सतर्क करून सर्वांना सुरक्षित खाली उतरवले. प्रवासी बाहेर पडताच बसने पेट घेतला. चालक, वाहक आणि नागरिकांनी जवळच्या हॉटेलमधून अग्निरोधक यंत्र आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तरीही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
चालकाने तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. कळताच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. पेटलेली बस पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. ज्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.