House Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri PM Awas Yojana: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएम आवास योजनेचा टप्पा दोन; हजारो कुटुंबांना घर मिळणार

सहा ठिकाणी गृहप्रकल्प राबविणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 8,745 सदनिका उपलब्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. किवळे आणि डुडुळगाव येथे प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे आठ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांतील आठ हजार 745 कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.

न्यायालयात वाद गेल्याने तसेच, मुदतीमध्ये जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला. तेथील लाभार्थ्यांना किवळ येथील खासगी गृहप्रकल्पात सदनिका देण्यात आल्या. प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या रावेत येथील गृहप्रकल्पाच पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

तसेच, रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे, आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेच्या वतीने दुसर्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी किवळे, रावेत, पुनावळे, वडमुखवाडी, मामुर्डी या पाच ठिकाणी आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहेत. तर, उर्वरित ताथवडे, चोविसावाडी आणि डुडूळगाव या तीन ठिकाणी एचडीएच गटासाठी (बेघरासाठी घरे) गृहप्रकल्प असणार आहे.

रावेत येथील 1 हजार 8 सदनिकांच्या गृहप्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाणार आहे, असे पंतप्रधान आवास योजना विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी सांगितले. महापालिकेने पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेत बोर्हाडेवाडी, चर्होली, पिंपरीतील उद्यमनगर आणि आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. आर्थिक दृष्ट्‌‍या दुर्बल घटकांतील कुटुंबांना 3 हजार 668 सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील 1 हजार 190 सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे.

सहा हजार 800 सदनिका बांधणार

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत चार प्रकल्पातील 3 हजार 668 सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील 1 हजार 190 सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. रावेत येथील 1 हजार 8 सदनिकांचा प्रकल्पाचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याचबरोबर मामुर्डीत 800, पुनावळेत 1 हजार 200, वडमुखवाडीत 1 हजार 200, ताथवडेत 2 हजार 400 आणि चोविसावाडीत 1 हजार 200 अशा 6 हजार 800 सदनिकांचा प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT