Pimpri Illegal Posters DP Box Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal Posters DP Box: पिंपळे गुरवमध्ये डीपी बॉक्सवर बेकायदा पोस्टर्सचा सुळसुळाट; धोका वाढला

पिंपळे गुरव परिसरात महावितरणच्या डीपी बॉक्सवर बेकायदा जाहिरात पोस्टर्स लावले जात असून अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: शहरातील महावितरणचे डीपी बॉक्स बेकायदा जाहिरात पोस्टर्सचे आगार बनले आहे. येथे शहरातील प्लॉटवाले, क्लास, सोने गहान ठेवणे तसेच इतर जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे. परंतु,महापालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे.

डीपी बॉक्स बेकायदा जाहिरातींचे केंद्र बनत चालल्याचे धक्कादायक चित्र पिंपळे गुरव परिसरात समोर आले आहे. भरदिवसा काही व्यक्ती महावितरणच्या डीपी बॉक्सवर जाहिरातींचे पोस्टर्स आणि बॅनर्स चिकटवत असल्याचे प्रकार उघडकीस आले असून, यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे हे पोस्टर्स लावताना संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाजवळ निष्काळजीपणे काम केल्यामुळे संबंधित व्यक्तींनाच विजेचा धक्का बसण्याचा धोका असून, पावसाळ्यात शॉर्टसर्किट किंवा स्पार्किंग होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या डीपी बॉक्सवर सर्रास जाहिराती चिकटवल्या जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. फाटलेले पोस्टर्स, डिंकाचे डाग आणि अस्वच्छता यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

डीपी अथवा ट्रान्सफॉर्मरवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती, पोस्टर्स किंवा बॅनर्स लावणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे विद्युत शॉक लागून गंभीर अपघात होऊ शकतो. तसेच शहराचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
संतोष पंचरस, सहाय्यक अभियंता, महावितरण.
केवळ सूचना देऊन न थांबता महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्त मोहीम राबवून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेकायदेशीर जाहिराती लावणारे तसेच संबंधित जाहिरातदारांवर दंडात्मक कारवाई करून हा सुळसुळाट तातडीने थांबवावा.
स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT