Pan Shop Drug Racket Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Pan Shop Drug Racket: पिंपरीत पानात नशायुक्त पावडरचा धक्कादायक प्रकार; पोलिसांची धडक कारवाई

चिंचवडमध्ये छापा, मेंदूवर परिणाम करणारे घटक आढळले; अमली पदार्थ रॅकेटचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: तुम्हाला ठेल्यावर जाऊन पान खायची सवय असेल, तर आता जरा अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काही पानठेल्यांवर ग््रााहकांना दिल्या जाणाऱ्या पानांमध्ये नशा आणणारी पावडर मिसळली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही पावडर शरीरासाठी घातक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शहरभर धडक मोहीम हाती घेतली असून, अनेक ठिकाणी तपास आणि कारवाई सुरू आहे.

चिंचवडमधून नशेची पावडर जप्त

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात अलीकडेच पोलिसांनी छापा टाकून मंगलमूर्ती या पानठेल्यावरून संशयास्पद पावडर जप्त केली आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर ठिकाणीही अशा प्रकारे विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जांबे येथील कारवाईशी या घटनेचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संबंधित विक्रेत्यांची चौकशी सुरू केली असून या साखळीचा विस्तार किती आहे, याचा तपास सुरू आहे.

जांबे गावात धागेदोरे

तपास करताना पोलिसांना या पावडरचा उगम मुळशी तालुक्यातील जांबे गाव परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार, संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावडरचा पुरवठा नेमका कोणाकडून होतो आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा काम करत आहे.

‌‘किक‌’मुळे रॅकेटचा उलगडा

एका ग््रााहकाने नेहमीप्रमाणे पान घेतले; मात्र ते खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याला अनपेक्षित गुंगी आणि चक्कर जाणवू लागली. सुरुवातीला हा प्रकार किरकोळ वाटला; पण प्रकृती बिघडू लागल्याने संशय निर्माण झाला. संबंधित तरुणाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान घेतलेल्या नमुन्यांमध्ये नशायुक्त घटक असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे पानाच्या माध्यमातून अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

मेंदूवर परिणाम करणारे घटक

जप्त करण्यात आलेल्या पावडरच्या प्राथमिक तपासणीत मेंदूवर परिणाम करणाऱ्या घातक रसायनांचा अंश आढळल्याची माहिती पुढे येत आहे. हे घटक शरीरात गेल्यानंतर त्वरित गुंगी, चक्कर किंवा नशेची भावना निर्माण करतात. सातत्याने सेवन केल्यास मानसिक अस्थिरता, व्यसनाधीनता आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या पानांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

तरुणांच्या आरोग्याशी खेळ

फूलचंद, कडक आणि विविध फ्लेवर्सचे पान हे विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याने त्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. आकर्षक चव आणि वेगळी मकिकफ मिळते, या कारणाने ग््रााहकांना सवय लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. सुरुवातीला मजा देणारे हे पान हळूहळू व्यसनात बदलू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालकांनी आणि तरुणांनीही या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा या प्रकरणातील जप्त नमुने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित पावडरमध्ये नेमके कोणते अंमली पदार्थ आहेत, हे स्पष्ट होणार आहे. अहवालानंतर दोषींवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून शहरातील विविध भागांत तपास मोहीम सुरू असून संशयित पानठेल्यांची कसून तपासणी केली जात आहे.

जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम

या पावडरचा दर मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले असून, त्यामागे संघटित नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय आहे. पान विक्रेत्यांपर्यंत ही पावडर पोहोचवणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पानाच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करणे हा अत्यंत गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. विशेषतः तरुणांनी अशा आकर्षणांना बळी न पडता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT