Pimpri Nala Cleaning Monsoon Preparation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Nala Cleaning Monsoon Preparation: पिंपरीत 143 नाल्यांची सफाई सुरू; एप्रिलअखेर काम पूर्ण होणार

पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेची तयारी; 50 टक्के काम पूर्ण, गुणवत्तेवर भर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व लहान-मोठे असे एकूण 143 नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 50 टक्के काम झाले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व नाले स्वच्छ करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 2 ते 11 मीटर रुंदीचे 100 किलो मीटर अंतराचे एकूण 145 नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार, टाकाऊ साहित्य तसेच, कचरा टाकला जातो. अनेक नागरिक घरगुती कचरा तसेच, निर्माल्य या नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर, हाऊसिंग सोसायट्या व दुकानांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांची मोठी वित्तहानी होते.

गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, रूपीनगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडी, चिंचवड गावासह अनेक भागांत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हरून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या (स्ट्रॉम वॉटर लाइन), चेंबर्स आणि गटारे स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. मात्र, गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आरोग्य विभागासह स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांकडून नालेसफाई कामास मार्च महिन्याच्या अखेरपासून सुरुवात करण्यात आली आहे. मनुष्यबळासह जेसीबी व इतर यांत्रिक साधने वापरून काम केले जात आहे. त्या कामाची माहिती गुगल स्प्रेडशिटमध्ये भरली जात आहे. आत्तापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.

नालेसफाईचे काम गुणवत्तापूर्ण हवे

पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी अधिक सजग व सक्षम राहणे आवश्यक आहे. नालेसफाईची कामे केवळ पूर्ण करणे नव्हे, तर ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

एप्रिलअखेर सर्व नाले साफ होणार

नालेसफाईचे काम सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांकडून करण्यात येत आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनद्वारे साफसफाई केली जात आहे. अरुंद नाल्यात मशिन जात नाहीत, अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येत आहे. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे छायाचित्रे घेतली जाणार आहेत. प्रत्येक आठवड्याला नालेसफाईचा आढावा घेण्यात येत आहे. हे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT