Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Municipal Live Streaming: पिंपरी महापालिकेत राजकीय वाद पेटला; सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद

पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप; सत्ताधाऱ्यांवर गैरकारभार लपवल्याचा विरोधकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: भाजपाच्या नव्या सत्ताधार्‍यांनी महापालिका सर्वसाधारण सभेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या जोश्यात सुरू केले. मात्र, त्या कारणांमुळेच सत्ताधार्‍यांचा नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे निघू लागले. नवख्या नगरसेवकांकडून अनेक चुका समोर येऊ लागल्या. त्याला वैतागून तसेच, उपसूचनांना लपवाछपवीसाठी सत्ताधार्‍यांनी ऑनलाईन प्रक्षेपणच बंद करण्यात आले. तो पारदर्शक कारभार नव्हे, तर गैरकारभार लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

पारदर्शक आणि गतीमान कारभाराचे वचन देत भाजपाने दुसर्‍यांदा महापालिका काबीज केली. महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे प्रक्षेपण करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सभेचे कामकाज प्रक्षेपणास सुरुवात केली.

अर्थसंकल्पाची विशेष सभेसह तीन सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे प्रक्षेपण करण्यात आले. निम्म्यापेक्षा अधिक नगरसेवक हे नवखे आहेत. यू ट्यूब आणि फेसबुकवर थेट प्रेक्षपण होत असल्याने अनेक नगरसेवक प्रत्येक विषयांवर आपले मत प्रदर्शन करू लागले. परिणामी, सभागृह कामकाजाची वेळ नाहक वाढू लागली. तहकूब विषयावरही नगरसेवक तास-दोन तास बोलू लागल्याने सभेचा महत्त्वाचा वेळ वाया जाऊ लागला. काही नगरसेवक सोशल मीडियाला रिल्स बनवून चमकोगिरीची हौस भागवू लागले.

लाईव्ह प्रक्षेपणामुळे हा प्रकार थेट शहरवासीयांपर्यंत पोहचत होता. कोणता नगरसेवक, कोणत्या विषयावर कसा बोलतो, हे नागरिकांना समजत होते. त्यावरून सत्ताधार्‍यांच्या अनेक चुका उजेड्यात आल्याने त्यांना अडचणीच्या ठरणार्‍या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच, वरिष्ठांकडून महापालिका कारभार्‍यांना धारेवर धरण्यात आले. नाहक बदनामी होत असल्याने लाईव्ह प्रक्षेपणच बंद करण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी घेतला. त्या आडून उपसूचनांना मंजुरीचा धडाका लावण्याचा तसेच, गैरकारभार लपवाछपवी करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

सत्ताधार्‍यांमधील अंतर्गत हेवेदावे उघड

सत्ताधार्‍यांमधील गटातटाचे राजकारण व हेवेदावे उघड होऊ लागले. पक्षातीलच विरोधी गट उघडपणे बोलू लागल्याने सत्ताधार्‍यांचे बिंग आपोआप बाहेर पडत होते. महत्त्वाच्या विषयाचे गांभीर्य सभागृहात दिसून येत नव्हते. त्यात महापौरांकडून सर्वांनाच बोलण्याची संधी दिली जात असल्याने सत्तेतील तसेच, विरोधातील नगरसेवक प्रशासनावर टीका करत तोंडसुख घेत होते. असंख्य उपसूचना पूर्ण न वाचता मंजूर केल्या जात होत्या. विषयाला सुसंगत उपसूचना दिल्या जात नाहीत. हा प्रकार हताशपणे पाहत असलेला विरोधक, सभागृहातील बेशिस्ती, नियंत्रण व समन्वय नसलेले नगरसेवक, विषयाचे गांभीर्य नसणे, असे चित्र सभागृहात पाहायला मिळत होते. महापौरांकडून सभा पटलावर नसलेल्या विषयावर परस्पर मंजुरीची मोहर उठवली जात होती.

नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचा मुहूर्त लागेना

सर्वसाधारण सभेचे कामकाज व्यवस्थित चालावे. सभागृहाचा नाहक वेळ वाया जाऊ नये. सभागृहात विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेते बोलल्यानंतर नगरसेवक बोलणार नाहीत, हे साधे साधे नियम नवख्यासह अनुभवी नगरसेवकांना समजावेत म्हणून सर्व 128 नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सभागृह कामकाज व त्यासंदर्भातील माहिती नगरसेवकांना दिली जाणार आहे, असे सत्ताधार्‍यांकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्याप तो मुहूर्त जुळून आलेला नाही.

महापालिका निवडणुकीत दिलेले आश्वासन हवेत ?

महापालिका निवडणुकीत भाजपाकडून गतिमान तसेच, पारदर्शक कारभारासह अनेक आश्वासन दिली गेली. पारदर्शक कारभार व्हावा, म्हणून सर्वसाधारण सभेसह इतर सभा व बैठकांचे थेट प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने नव्या कारभारांनी सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू केले. मात्र, त्यात छोट्या व मोठ्या चुका व गैरप्रकार उघड होऊ लागले. त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्याचा टोकाचा निर्णय कारभार्‍यांनी घेतला आहे. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रक्षेपण बंद केल्याने आयुक्तांना नोटीस

ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्याकडून अ‍ॅड. असीम सरोदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना नोटीस बजावली आहे. दिल्लीतील संसद भवन, राज्यातील मुंबईतील विधीमंडळ अधिवेशनाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. मग, महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज लाईव्ह का बंद करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपाचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून खटाटोप

महापालिकेच्या तीन सभांमध्ये जनतेला सगळ्याच नगरसेवकांची बुद्धिमता व हुशारीचा उजेड दिसला आहे. जनतेला आपण बुद्धी गहाण ठेवून कुणाला निवडून दिले, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यामुळे सभेमध्ये आपलीच चमकोगिरी आपल्याच तोंडाला काळं फासत आहे, असे वाटले असावे. आपल्याच पक्षातील लोकांनी केला भ्रष्टाचार आज उद्या सभेत बाहेर निघाला, तर जनतेसमोर कुठल्या तोंडाने उभे राहणार, हा घटनांना घाबरून सभेचे प्रक्षेपण बंद केले असावे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा कोंडे-बाबर यांनी केली आहे.

प्रक्षेपण बंद केले म्हणजे पारदर्शक कारभार नाही, असे म्हणणे चुकीचे

सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण हे अर्थसंकल्पाच्या विशेष सभेसाठी सुरू करण्यात आले होते. सभेचे लाईव्ह प्रक्षेपण केले म्हणजे सभा कामकाज पारदर्शक आहे, असे म्हणता येत नाही. थेट प्रक्षेपण केले नाही, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा गतिमान व पारदर्शक कारभार सुरू आहे, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT